भाजीपाला खरेदीदारांचा संप मागे

By Admin | Updated: March 8, 2017 00:24 IST2017-03-08T00:24:54+5:302017-03-08T00:24:54+5:30

अडतीचा विषय अडते-व्यापाऱ्यांच्या पातळीवर सोडविण्याचा निर्णय :समन्वयासाठी समितीची स्थापना

Vegetable buyer's back | भाजीपाला खरेदीदारांचा संप मागे

भाजीपाला खरेदीदारांचा संप मागे

कोल्हापूर : बाजार समितीच्या भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी संप मागे घेत आज, बुधवारपासून खरेदी नियमित करण्याचा निर्णय जाहीर केला. ६ टक्के अडतीविषयी अडते व व्यापाऱ्यांच्या पातळीवर सोडवून इतर मागण्यांबाबत समन्वय व समितीची स्थापनाही करण्यात आली.
भाजीपाला मार्केटमधील ‘मोघम पद्धती’ बंद करा, ६ टक्के अडत रद्द करा, सौदा सकाळी पाच ते सात या वेळेत काढा, या मागणीसाठी गेली आठ दिवस समितीमधील भाजीपाला व्यापाऱ्यांनी ‘खरेदी बंद’ आंदोलन सुरू केले. अडते, व्यापारी व समिती प्रशासन यांच्यात चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या, पण व्यापारी अडत न देण्यावर ठाम राहिल्याने पेच निर्माण झाला होता. मंगळवारी सकाळपासून भाजीपाला विक्रेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात उपोषणास सुरुवात केल्याने प्रकरण चांगलेच चिघळले होते. त्यामुळे दुपारनंतर संप मागे घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले. सायंकाळी सहा वाजता बाजार समितीच्या सभागृहात अडते व व्यापाऱ्यांची बैठक होऊन विविध विषयांवर जोरदार चर्चा झाली. शेतकरी माल भरताना भाजीच्या खाली एक ते दोन किलो पाला घालतात त्याचा फटका बसतो. वांग्यांच्या करंडीत वर चांगला माल आणि तळाला मोठा माल घातल्याने मोठे नुकसान होत असल्याचे व्यापाऱ्यांनी निदर्शने आणून देत त्यात अडत द्यायची म्हटले तर आमचे कंबरडे मोडते, अशी व्यापाऱ्यांनी कैफियत मांडली. अडतीचा विषय सरकारच्या पातळीवर असल्याने येथे काहीच निर्णय होणार नाही. त्यात हातावर पोट असणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या अधिक आहे. गेले आठ दिवस सगळ्यांनाच त्रास झाल्याने अडतीचा विषय बाजूला ठेवून संप मागे घेत असल्याचे व्यापाऱ्यांनी बैठकीत सांगितले. सभापती सर्जेराव पाटील, नंदकुमार वळंजू, सदानंद कोरगांवकर, जमीर बागवान, विलास मेढे, राजू लायकर आदी उपस्थित होते.
चौकट-
अडत ५०-५० टक्के?
व्यापाऱ्यांना ६ टक्के अडत अडचणीची ठरत असल्याने त्यातील ३ टक्के अडत अडत दुकानदारांनी सोसावी, असा एक प्रवाह चर्चेदरम्यान पुढे आला. त्यामुळे अडतीचा विषयी दोघांच्या पातळीवर सोडून संप मागे घेण्यात आल्याचे समजते.
———————————————————-
कोट-
कायद्याने अडत व्यापाऱ्यांकडूनच खरेदी करावी लागते. व्यापाऱ्यांच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ. आठ दिवसांच्या कोंडीमुळे सर्वच घटकांना त्रास झाला, अखेर व्यापाऱ्यांनी समजूतदारपणा घेतल्याने मार्ग निघाला.
- सर्जेराव पाटील-गवशीकर (सभापती, बाजार समिती)
——————————————————————————-
अडतीचा विषयी सरकारच्या पातळीवर असल्याने त्या पातळीवर आम्ही प्रयत्न करणार आहे. संपामुळे गोरगरीब व्यापाऱ्यांच्या नुकसानीचा विचार त्यामुळे संप मागे घेण्याचा निर्णय घेतला.
- मेहबूब बागवान (किरकोळ भाजीपाला विक्रेता संघटना)
——————————————————————
अडतीबाबत सरकारच्या पातळीवर लढा देण्यासाठी व्यापाऱ्यांना आम्ही पाठबळ देऊ, या मुद्द्यावरच संप मिटला.
- जमीर बागवान (अध्यक्ष, भाजीपाला व्यापारी असोसिएशन)
—————————————————————————
व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन तोडगा काढला, त्यांच्या इतर मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ पण येथून पुढे पूर्वकल्पना न देता मार्केट बंद पाडायचे नाही. यासाठी समितीची स्थापना केली आहे.
- नंदकुमार वळंजू (व्यापारी प्रतिनिधी)
——————————————————————
फोटो ओळी : भाजीपाला विक्रेत्यांनी मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात उपोषण सुरू केले. (फोटो-०७०३२०१७-कोल-बाजार) (छाया- आदित्य वेल्हाळ)

Web Title: Vegetable buyer's back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.