अविकसित क्षेत्रांसाठी व्हावा विज्ञानाचा उपयोग - प्रकाश आमटे

By Admin | Updated: January 6, 2017 21:29 IST2017-01-06T21:29:43+5:302017-01-06T21:29:43+5:30

ज्ञान-विज्ञान संपादनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या अविकसित क्षेत्रातील भावंडांच्या हितासाठी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे

Use of Vascular Science for Avalanches - Prakash Amte | अविकसित क्षेत्रांसाठी व्हावा विज्ञानाचा उपयोग - प्रकाश आमटे

अविकसित क्षेत्रांसाठी व्हावा विज्ञानाचा उपयोग - प्रकाश आमटे

 ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. 6 -  समाजसेवेचा वसा मला बाबांकडून थेट मिळाला व भामरागडच्या जंगलातील आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा प्रवास सुरू झाला. ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या माध्यमातून ज्ञान-विज्ञान संपादनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाच्या अविकसित क्षेत्रातील भावंडांच्या हितासाठी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. प्रकाश बाबा आमटे यांनी केले.
विश्वशांती गुरुकुल निवासी विद्यालय, वाखरी, एमआयटी अ‍ॅकॅडमी इंजिनीअरिंग, आळंदी (पुणे) आणि दूरदर्शन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित चौथ्या राष्ट्रीय पातळीवरील ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे, रोबोटिक्स युनिव्हर्सिटी कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉ. ओहोळ, एमआयटी ग्रुप आॅफ इन्स्टिट्युशन्स पुणेच्या कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे, प्रकल्प संचालक डॉ. पी. एन. प्रसाद, विभागप्रमुख प्रा. प्रभा कासलीवाल, पंढरपूर विश्वशांती गुरूकुलच्या प्राचार्या के. सुनिता व श्रीकांत देशमुख आदी उपस्थित होते. दोन दिवसीय स्पर्धेची संकल्पना ‘स्मार्ट सिटी’ अशी आहे.
डॉ. प्रकाश बाबा आमटे म्हणाले, आपल्या देशात कमालीची विषमता आहे. एकीकडे अफाट संपत्ती आणि दुसरीकडे टोकाचे दारिद्र्य आहे. आज भारतात ४० टक्के लोक दारिद्र्यरेषेखाली आहेत. विद्यार्थ्यांनी संशोधनाकडे लक्ष द्यावे, नवीन तंत्रज्ञान विकसित करावे व अशाप्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेवटच्या माणसाला दोन वेळचे जेवण मिळेल, अशा प्रकारचा विकास करावा. आदिवासी भागातील अज्ञान, अंधश्रध्दा दूर केल्या पाहिजेत. त्यांना त्या भागामध्ये शिक्षण, आरोग्य आणि रोजगार उपलब्ध करून दिला तर, या भागाचा चांगला विकास होईल. सर्व घडण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. आज केंद्र सरकारकडून येणाºया विविध योजना आदिवासींपर्यंत जातच नाहीत. त्या मधल्यामध्ये झिरपून जातात. हे कसे होते, याचा शोध घेऊन ते नाहीसे केले तर तेथील लोकांचे जीवनमान सुधारून आपल्या देशाची निश्चितच उन्नती होईल, असे सांगितले.
प्रा. डॉ. विश्वनाथ कराड म्हणाले, ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेच्या निमित्ताने निघालेली ही आळंदी ते पंढरपूर अशी ज्ञान-विज्ञानाची दिंडी आहे. पंढरपूर ही विकार-विकल्प दूर करणारी ज्ञान पंढरी व्हावी, या दृष्टीने केला जाणारा हा प्रयत्न असून ज्ञानमयो विज्ञानमयोसी हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे. विश्वशांतीचा संदेश जगाला देण्याची वेळ आता आली आहे. त्यासाठीच्या कार्यक्रमात पीडित व आदिवासींना मुख्य प्रवाहात आणणाऱ्या   डॉ. प्रकाश बाबा आमटे यांंच्यासारखा मार्गदर्शक आज लाभल्याने शुभाशिर्वाद लाभल्याचे समाधान मिळाले, असे सांगितले.
प्रास्ताविक डॉ. पी. एन. प्रसाद यांनी केले. स्पर्धेविषयीची संकल्पना कार्यकारी संचालिका डॉ. स्वाती कराड-चाटे यांनी विशद केली. सूत्रसंचालन प्रा. प्रेरणा त्रिपाठी यांनी केले. गणेशकुमार यांनी आभार मानले.

५००हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पंढरपूर येथे आयोजित चौथ्या राष्ट्रीय ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धेत मुंबई, पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद, सोलापूर, नागपूर, नांदेड, लातूर आदी शाळांमधून ५०० हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत. ‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर आधारित विविध रोबोंचे प्रात्यक्षिक या स्पर्धेतून ते दाखविणार आहेत.
पंढरपूर स्मार्ट ज्ञान पंढरी व्हावी
‘स्मार्ट सिटी’ संकल्पनेवर आधारित ज्युनिअर रोबोकॉन स्पर्धा ही गांधींजींच्या स्वप्नातील स्मार्ट खेडी निर्माण करणारी ठरून ‘पंढरपूर ही स्मार्ट ज्ञान पंढरी व्हावी’ हा या उपक्रमामागील प्रेरणास्त्रोत आहे. ‘नमामि गंगे’प्रमाणे ‘नमामि चंद्रभागा’ प्रकल्प सुरू करून येथे गीतेच्या १८ अध्यायांप्रमाणे घाट उभे करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

Web Title: Use of Vascular Science for Avalanches - Prakash Amte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.