सोलापूरकरांसाठी अनोखी हवाई सफर
By Admin | Updated: November 5, 2014 15:10 IST2014-11-05T15:10:35+5:302014-11-05T15:10:35+5:30
'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला.

सोलापूरकरांसाठी अनोखी हवाई सफर
सोलापूर : 'काय रे तू हवेत आहेस'! होय, खरंच मी हवेत आहे ! अद्वीप फ्लाईंग असोसिएशन आणि रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ-ईस्टच्या फ्लाईंग फेस्टिव्हलचा आज पहिल्याच दिवशी सोलापूरकरांनी हवाई सफरीचा आनंद लुटला. सोलापूर विमानतळावर ९ नोव्हेंबरपर्यंत फ्लाईंग फेस्टिव्हल चालणार आहे.
आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, पद्मश्री विजेत्या शीतल महाजन, डॉ. शिरीष वळसंगकर, डॉ. व्यंकटेश मेतन, चव्हाण मोटार्सचे घनश्याम चव्हाण, माजी उपमहापौर आप्पाशा म्हेत्रे, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, विमानतळाचे प्रमुख श्रीवास्तव, डॉ. लब्बा आदींच्या उपस्थितीत आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून फेस्टिव्हलचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकारी गेडाम, मनपा आयुक्त गुडेवार, पोलीस उपायुक्त नीलेश अष्टेकर यांनी आपल्या मुलांसमवेत हवाई सफर केली.
पक्षी आकाशात उडताना मुलांना त्याचे खूप आकर्षण असते. आकाशात उडण्याचा एक वेगळा आनंद त्यांना असतो. आज खर्या अर्थाने त्यांची इच्छा पूर्ण झाल्याचे डॉ. गेडाम म्हणाले. सोलापूरचे पर्यटन व्यापक करण्यासाठी अशा महोत्सवाची गरज असल्याचे आ. प्रणिती शिंदे यांनी सांगितले. राकेश उदगिरी यांनी महोत्सवाची संकल्पना मांडली तर पद्मश्री विजेत्या शीतल महाजन यांनी पॅराशूटचे हवेतील वेगवेगळे प्रकार उपस्थितांसमोर मांडले. प्रारंभी पवन मोंढे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकेत त्यांनी प्लाईंग फेस्टिव्हल सोलापूरकरांसाठी नवा असून, महोत्सवाच्या माध्यमातून हवेत उडण्याचा आनंद घेण्याचे नमूद केले. सूत्रसंचालन अनिल सहस्त्रबुद्धे यांनी केले तर भास्कर मोरे यांनी आभार मानले. यावेळी पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे, संतोष बायस, डॉ. सिद्धेश्वर वाले, संतोष बुरबुरे, नागेश शेंडगे, संजय अँड्सचे संजय तोडकरी, नंदकिशोर हबीब, वैभव होमकर, दीपक चिंता, अंजली तिवारी, बाळकृष्ण लाड, सोमेश्वर याबाजी आदी उपस्थित होते.
-------
जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांनी आपल्या भाषणात मनपा आयुक्तांकडे पाहत 'यानंतर तुम्ही-आम्ही हवाई सफर करणार आहोत. हवाई सफरीचा आनंद जरूर घ्या, मात्र वेगळे विचार मनात आणून कुठे किती घरे आहेत, हे पाहू नका', असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.