उजनी धरण आज १०० टक्के भरणार

By Admin | Updated: September 4, 2014 00:57 IST2014-09-04T00:57:06+5:302014-09-04T00:57:06+5:30

सोलापूरची वरदायिनी : ३४ वर्षांत २७ वेळा उजनीने गाठली शंभरी

Ujani Dam today will fill 100 percent | उजनी धरण आज १०० टक्के भरणार

उजनी धरण आज १०० टक्के भरणार

बेंबळे: संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण, राजकारण आणि समाजकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणाने उशिरा पण संथ गतीने का होईना एक-एक, अर्धा-अर्धा टक्क्याने वाढत आज अखेर शंभरीचा टक्का जवळ केला आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत धरण १०० टक्के भरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांबरोबर उद्योगधंदे, कारखानदार व नागरिकांचा जीव भांड्यात पडला़ उजनी धरणातील पाण्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते.
----------------------------
सलग नऊ वेळा शंभरी
उजनीच्या इतिहासात ३४ वर्षांत उजनी धरण तब्बल २७ वेळा १०० टक्के भरले आहे तर यावेळीही १०० टक्के भरले आहे. २०१२ चा अपवाद वगळता उजनी धरण सलग नऊ वेळा १०० टक्के भरले आहे.
---------------------
१०० टक्के पाणी साठवणार
गेल्या चार ते पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी कमी होत चालल्यामुळे उजनी धरणात ११० टक्के पर्यंत पाणी साठवले जाते. उजनी धरणाने १०० टक्केची पातळी गाठल्यानंतर वरुन येणाऱ्या विसर्गाचा वेग पाहून उजनीतून भीमा नदीत पाण्याचा विसर्ग सोडला जातो.
-------------------------
वीज निर्मितीही चालू होणार
उजनी धरण १०० टक्के झाल्यामुळे उजनीवरील वीज निर्मितीही चालू होते. त्या केंद्रातून दररोज १२ मेगावॅटची वीज निर्मिती केली जाते. उजनी भरल्याने बळीराजा सुखावला आहे, साखर कारखानदारही चिंतामुक्त झाला आहे. मात्र या पाण्याचे योग्य नियोजन केले गेले पाहिजे अन्यथा हे पाणीही पुरेसे ठरणार नाही हे नक्की.
------------------------------
या धरणातून डावा आणि उजव्या कालव्याद्वारे शेतीला पाणी मिळते. तब्बल ४३२ किलोमीटर कालव्याचे अंतर आहे.
याद्वारे डावा ९६ हजार हेक्टर, उजवा ५१ हजार ८०० हेक्टर क्षेत्र व भीमा नदी, सीना नदी, बोगदा व इतर उपसा सिंचन योजनेद्वारे सुमारे अडीच लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे.
उजनी धरणाच्या एकूण आयुष्यात सर्वात उशिरा धरण १०० टक्के भरले ते २००९ मध्ये.
त्यात विशेष म्हणजे १०० टक्के धरण झाले ते प्रथमच उजनी धरणातील पाणलोट क्षेत्रातील पावसाच्या जीवावरच.
उजनीचे जलसंपदाशास्त्र उगम क्षेत्रातल्या पावसावर अवलंबून आहे, मात्र २००९ साली उजनीवरील १८ धरणांत पुरेसा पाणीसाठा न झाल्यामुळे त्या धरणांतून उजनीत एकही थेंब पाणी आले नव्हते. मात्र थोड्या थोड्या पावसाने उशिरा का होईना पण पहिल्यांदाच असे १०० टक्के धरण भरले होते.
----------------------------
उजनी राजकारणाचा एक विषय
उजनी धरणामुळे लाखो शेतकरी सुखावले आहेत. प्रत्येक पावसाळ्यात सोलापूर, नगर, उस्मानाबाद, पुणे जिल्ह्यातील सर्वांचे लक्ष उजनीतील पाणी पातळीकडे लागलेले असते. उजनी आहे तर सर्व काही अशी परिस्थिती सर्वसामान्यांची होती. मात्र या उजनीला राजकारणातही गेल्या काही वर्षापासून अनन्य साधारण महत्त्व येऊ लागले आहे. उजनीच्या पाण्यासाठी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पुढारी धडपडू लागले आहेत. पाणी पळविण्यासाठी, अडविण्यासाठी, राजकीय डावपेचासाठी उजनीचा वापर होऊ लागल्याने सर्वसामान्य शेतकरी मात्र चिंताग्रस्त होऊ लागला आहे. पाण्याचे राजकारण सर्वसामान्याला भोवणार ही चिन्हे दिसू लागली आहेत, हे चुकीचे आहे.
---------------------------
११ वर्षांत धरणाचे बांधकाम पूर्ण
उजनी धरण बांधण्यास १९६९ साली सुरूवात झाली. या प्रकल्पासाठी सुरुवातीला ४० कोटी रुपये मंजूर झाले होते, मात्र उजनी धरण पूर्णत्वास येण्यास ६२.६९ कोटी रुपये लागले होते. सतत ११ वर्षांच्या परिश्रमानंतर १९८० ला उजनीचे काम पूर्ण झाले. २७ सप्टेंबर १९८० ला तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाचे लोकार्पण केले. प्रथम १९८१ सालापासून उजनीत पाणी साठविण्यास सुरूवात झाली.
---------------------------------
मृतसाठ्यात सर्वात मोठे धरण
उजनी धरणाच्या परिक्षेत्रात ५०० मिमी पाऊस व उगम परिसरातून वरील १९ धरणे ४३२० मिमी पावसाच्या अवलंबतेवर जलसंपदा शास्त्र निर्माण केले आहे. उजनी धरण हे महाराष्ट्रातील जायकवाडी व कोयना धरणानंतर सर्वात मोठे धरण असून, मृतसाठ्याबाबत सर्वात मोठे आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता ३३२० द. ल.घ. मी. (११८ टीएमसी) तर उपयुक्त साठवण क्षमता १५१७.१९ द. ल. घ. मी., मृतसाठवण क्षमता १८०२.८१ द. ल.घ. मी. उपयुक्त साठ्यापेक्षा(५३.५७ टीएमसी) मृतसाठा (६३.६५ टीएमसी) मोठे असलेले एकमेव धरण आहे. पाणलोट क्षेत्र १४८५६ चौ. कि. मी. असून, या धरणाखाली २९ हजार हेक्टर क्षेत्र, ५१ गावे (पुणे २५, सोलापूर २३ तर अ. नगर ३) बुडाली आहेत.
----------------------------
उजनीने २७ व्यांदा गाठली शंभरी
उजनीत यावर्षी १०० टक्के पाणीसाठा होतो की नाही, अशी सर्वांनाच शंका होती. उशिरा का होईना उजनी धरण १०० टक्के पर्यंत पोहचले आहे. उजनीने २७व्यांदा शंभरी गाठली आहे़

Web Title: Ujani Dam today will fill 100 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.