दारू पिऊन भांडणात दोन भावंडांनी केला शेतमजुराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:48 IST2021-09-02T04:48:16+5:302021-09-02T04:48:16+5:30
अकलूज : दारू पिऊन भांडण काढून दोन भावंडांनी एका शेतमजुराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यात तांबवे ...

दारू पिऊन भांडणात दोन भावंडांनी केला शेतमजुराचा खून
अकलूज : दारू पिऊन भांडण काढून दोन भावंडांनी एका शेतमजुराच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना माळशिरस तालुक्यात तांबवे येथे घडली. याप्रकरणी अकलूज पोलिसांनी दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून हे दोघे फरार झाले आहेत.
प्रदीप माणिक वाळेकर (वय ४०) असे खून झालेल्या शेतमजुराचे नाव असून सोमवार, ३० ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान हे खून प्रकरण घडले.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार मयत शेतमजूर प्रदीप वाळेकर, जितेंद्र सुखदेव चव्हाण आणि रघुनाथ सुखदेव चव्हाण (सर्व रा. तांबवे, ता. माळशिरस) हे तिघे रवींद्र रावसाहेब इनामदार यांच्या शेतात कामावर गेले होते. त्यानंतर तांबवे गावच्या शिवारातील लक्ष्मण चव्हाण यांच्या शेतात नारळाच्या झाडाखाली जाऊन ते दारू प्यायले. दरम्यान, जितेंद्र चव्हाण व रघुनाथ चव्हाण या दोन भावंडांनी प्रदीप वाळेकर यांच्याशी भांडण काढले. या भांडणात त्या तिघांमध्ये वाद वाढत गेला आणि त्या दोघांनी प्रदीपच्या डोक्यात दगड घालून जखमी केले. या हल्ल्यात प्रदीप हा गंभीर जखमी होऊन मरण पावला. या घटनेनंतर त्या दोघांनी तेथून पळ काढला.
याबाबत लालासाहेब नामदेव वाळेकर यांनी अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अकलूज पोलिसांनी जितेंद्र व रघुनाथ चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक वैभव मारकड करीत आहेत.
-----