महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
By Admin | Updated: January 3, 2017 20:14 IST2017-01-03T20:14:19+5:302017-01-03T20:14:19+5:30
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील मोहोळचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्या प्रकरणी सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता

महावितरणच्या दोन अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 3 - महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीतील मोहोळचे उपकार्यकारी अभियंता विकास पानसरे यांच्या आत्महत्या प्रकरणी सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता धनंजय औँढेकर व सोलापुर ग्रामीण चे कार्यकारी अभियंता बालाजी डुमने या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच या दोन अधिकाऱ्यांची महावितरणने दोघांची तडकाफडकी बदली केली. त्यांच्या जागी ज्ञानदेव पडळकर यांची सोलापूर महावितरणचे नवे अधिक्षक अभियंता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
याबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि २९ डिसेंबर रोजी दुपारी २.३० वाजनेच्या पूर्वी मोहोळ येथील राहत्या घरी विकास पंढरीनाथ पानसरे ( वय -४२) यांनी टॉवेलच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याबाबत मयत पानसरे यांच्या पत्नी अनिता पानसरे रा. पुणे यांनी त्याच दिवशी वरिष्ठ अधिकारी डुमने व पानसरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा लेखी जबाब दिला होता. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्याचे पो. उपनिरीक्षक नजीर खान यांनी प्रथम तपास केला. मयताचे चौकशी मध्ये अनीता पानसरे यांनी दि. ३ जानेवारी २०१७ रोजी फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादिनुसार बालाजी डुमने व धनंजय औंढेकर या दोन अधिकाऱ्यांनी संगनमताने विकास पानसरे यांना नोकरीवर असताना वेळोवेळी अपमानस्पद वागणूक देवून, लोकांचे समोर अपमानास्पद बोलून, कामाचे व्यतिरिक्त अन्य त्रास देत असल्याने तसेच दि २७ व २८ डिसें रोजी पानसरे यांना रजेवरुन नोकरीवर हजर करुन न घेता, दोघांनी आणखी मानसिक त्रास दिला. आॅफिस बाहेर थांबवून त्यांचे वरिष्ठ चीफ इंजिनीअर नागनाथ इरवाडकर यांनी हजर करुन घेण्यास सांगून देखील डुमने व औंढेकर यांनी त्यांना हजर करुन घेतले नाही. विकास पानसरे यांना वरील दोन अधिकाऱ्यांनी दिलेल्या मानसिक त्रासामुळे,आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याचे सांगितल्याने त्यांच्यासमोर आत्महत्या शिवाय पर्याय नसल्याने, जीवनास कंटाळूनच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.आत्महत्या करण्यास या दोन अधिका?्यांनी प्रवृत्त केले आहे. अशी फिर्याद मयताच्या पत्नी अनीता पानसरे यांनी मोहोळ पोलिसात दाखल केली आहे. त्यानुसार डुमने व औंढेकर यांच्यावर भादवि ३०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपाधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास पो. नि.राजेंद्र मस्के करीत आहेत.