सोलापूरजवळील अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी
By Admin | Updated: October 5, 2016 20:37 IST2016-10-05T20:37:45+5:302016-10-05T20:37:45+5:30
लिंबीचिंचोळी-तोगराळी रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोलापूरकडे येणा-या मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला.

सोलापूरजवळील अपघातात दोन ठार, एक गंभीर जखमी
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि.05 - लिंबीचिंचोळी-तोगराळी रोडवर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने सोलापूरकडे येणा-या मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले तर अन्य एक जण गंभीर जखमी झाला. बुधवारी सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ही घटना घडली. प्रकाश अंबादास कांबळे (वय २३), सिद्राम हुळ्ळे (वय ३५, दोघे रा. सिद्धरामेश्वरनगर, विनायकनगरजवळ, आकाशवाणी रोड, सोलापूर) अशी मयत झालेल्यांची नावे आहेत.
जनावरांना उसाचे वाडे पाहण्यासाठी मयत प्रकाश कांबळे, सिद्राम हुळ्ळे आणि चिदानंद बापूराव चाबुकस्वार हे तिघे दुपारी मोटरसायकलवरुन तोगराळी गावाला गेले होते. काम आटोपून तिघेही सोलापूरकडे येत असताना लिंबीचिंचोळी-तोगराळी रस्त्यावर अज्ञात वाहनाने धडक दिल्याने यातील प्रकाश आणि सिद्राम हे दोघे गंभीररित्या जखमी होऊन मरण पावले. तिसरा चिदानंद चाबुकस्वार हा गंभीर जखमी झाला. त्याच्यावर उपचार करण्यासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यातील मयत प्रकाश हा विवाहित असून, टमटम चालवण्याचा त्याचा व्यवसाय होता तर दुसरा मयत सिद्राम हा बिगारी काम करीत होता. दोघांनाही एकेक मुलगा आहे. वळसंग पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. अपघातातील अज्ञात वाहनाने घटनास्थळावरुन पोबारा केल्याचे वृत्त आहे.