Dr Shirish Valsangkar Solapur : सोलापूर शहरातील विख्यात मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी त्यांच्याच वळसंगकर हॉस्पिटलची प्रशासनाधिकारी मनीषा माने-मुसळे हिला पोलिसांनी शनिवारी रात्री ११ च्या सुमारास अटक केली. न्यायालयाने रविवारी तिला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मनीषाने मुलांना मारून स्वतः पेटवून घेण्याची धमकी देणारा मेल डॉक्टरांना पाठवला होता. यामुळे नैराश्यात गेलेल्या डॉ. वळसंगकरांनी स्वतःचे जीवन संपवण्याचे पाऊल उचलले. फिर्यादीत यासंदर्भातील तपशील देण्यात आला आहे.
डॉ. वळसंगकर यांनी शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास बेडरूममधील अॅटॅच बाथरूममध्ये आपल्या परवाना असलेल्या पिस्तुलने डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. प्रतिथयश डॉक्टरांनी नेमके हे पाऊल का उचचले, हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. डॉ. वळसंगकरांच्या पार्थिवावर शनिवारी सायंकाळी अंत्यसंस्कार झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव डॉक्टर अश्विन यांना डॉक्टरांच्या पॅटमधील डाव्या खिशात सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये डॉक्टरांनी आपल्या आत्महत्येला हॉस्पिटलची प्रशासनाधिकारी मनीषा माने-मुसळे यांना जबाबदार धरले होते. तत्पूर्वी मनीषाने डॉ. वळसंगकर आणि डॉ. अश्विन यांना ई-मेल पाठवून उपरोक्त धमकी दिली होती. डॉक्टरांची सुसाईड नोट पाहून डॉ. अश्विन यांनी शनिवारी सदर बझार पोलिस ठाण्यात रितसर फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी त्याच रात्री ९:३० वाजता महिला हवालदार गवसाने यांनी मनीषाला ताब्यात घेतले. नंतर तिला रात्री ११ वाजता फौजदार संजीवनी व्हट्टे यांनी अटक केली.
मनीषाचा मेल...मनीषाने डॉ. शिरीष वळसंगकर व डॉ. अश्विन यांना जो मेल पाठवला आहे त्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला असून, त्यामध्ये असे नमूद आहे की, 'मनीषाचे अधिकार कापले, पगार कमी केला, त्यामुळे मनीषाने दोन्ही मुलांना मारणार आणि हॉस्पिटलमध्ये येऊन पेटवून घेणार, त्याला सर्वस्वी जबाबदार स्टाफ व सर्व वळसंगकर कुटुंबीय राहतील.
सुसाईड नोटमनीषाचा मेल आल्यानंतर व्यथित झालेल्या डॉ. वळसंगकरांनी सुसाईड नोटमध्ये म्हटले आहे की, 'ज्या माणसाला मी शिकवून आज एओ (प्रशासनाधिकारी) केले आहे आणि चांगला पगार देतो आहे, त्याने खोटारडे आणि घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, त्याचे मला अतिव दुःख होत आहे आणि म्हणून मी माझे जीवन संपवत आहे. मजकुरात एओ मुसळे असे नमूद केले आहे.
गांभीर्यामुळे अटकेला परवानगीसूर्यास्तानंतर एखाद्या आरोपीला अटक करायची असल्यास कोर्टाची परवानगी घेणे आवश्यक ठरते. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्ट नं. १ यांची परवानगी प्राप्त करून महिला फौजदार संजीवनी व्हट्टे यांनी शनिवारी रात्री ११ वाजता मनीषा माने हिस अटक केली. यासंदर्भात तिच्या पती महेश माने यास कळवण्यात आले. अटकेच्यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे पालन केल्याचे सांगण्यात आले.