बाराशे लहानग्यांना मिळाली मायेची ऊब
By Admin | Updated: November 24, 2014 23:07 IST2014-11-24T22:36:53+5:302014-11-24T23:07:34+5:30
‘लोकमत’चा पुढाकार : सातारकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभलेली मोहीम सुफळ संपूर्ण

बाराशे लहानग्यांना मिळाली मायेची ऊब
सातारा : रस्त्याकडेच्या कळकटलेल्या, फाटक्या वस्त्या... पालांमधलं अठराविश्व दारिद्र्य आणि चेहऱ्यावर लपवता न येणारी अगतिकता... अशा वस्त्यांमधल्या लहानग्या चेहऱ्यांवर स्मितरेषा रेखाटण्याची किमया सातारकरांनी ‘लोकमत’च्या खांद्याला खांदा लावून केली. सुमारे बाराशे उघड्या मुलांना ऐन थंडीत मायेची ऊब देऊन सातारकरांनी मोहीम फत्ते केली.
शहरात सुमारे एक हजार गरीब मुलं ऐन थंडीत उघड्यावर झोपतात, त्यांना पुरेसे कपडेही मिळत नाहीत असे पाहणीत आढळून आल्यावर ‘लोकमत’ने या मुलांसाठी घरातील जुने कपडे देण्याचे आवाहन सातारकरांना १२ सप्टेंबरच्या अंकातून केले. त्याला तातडीने आणि भरभरून प्रतिसाद देऊन सातारकरांनी संवेदनशीलतेचा पुन्हा एकदा प्रत्यय दिला. दोनच दिवसांत म्हणजे बालदिनी, १४ नोव्हेंबरपासून ‘लोकमत’टीम आणि या मोहिमेसाठी स्वयंस्फूर्तीने सरसावलेल्या तरुण कार्यकर्त्यांनी दोन वस्त्यांमध्ये कपड्यांचे वाटप सुरूही केले.
गोडोली येथील गोसावी आणि गोंड आदिवासींच्या वस्तीत कपडेवाटपास सुरुवात झाली. त्यानंतर महामार्गालगत असलेल्या सहा वस्त्यांमध्ये आजअखेर कपडेवाटप करण्यात आले आहे. सातारकरांनी या चिमुकल्यांसाठी तब्बल ३ हजार ५०० पेक्षा जास्त कपडे दिले. विशेष म्हणजे, कपड्यांचा व्यापार करणाऱ्या काहीजणांनी नवे कपडे दिले. सुमारे तीनशे नवे स्वेटर आणि जर्किन ‘लोकमत’कडे जमा झाले. याखेरीज महिलांनी साड्या आणि काहीजणांनी बूटही दिले.
महामार्गालगतच्या सहा वस्त्या, ‘प्रांजली’समोरील वस्ती, म्हसवे रस्त्यावरील कातकरी वस्ती अशा आठ झोपडपट्ट्यांमधील मुलांना ऊबदार कपडे मिळाले.
घरोघरी फिरून कपडे गोळा करून ही महत्त्वाकांक्षी मोहीम यशस्वी करण्यासाठी नीलेश धनवडे, विशाल शिंदे, सचिन सावंत, महेश महाजन, मनोज खडतरे, विलास त्रिेंबके, रोहन घोरपडे, समीर निकम, युवराज शिंदे, राहुल घोरपडे, पिंटू देवरे, शुभम हेंद्रे, तनय मोरे, अभिजित गार्डे, अमर जाधव, अमर पाटील या तरुणांनी अविरत कष्ट घेतले. (प्रतिनिधी)
लहानग्यांचा उत्साह
‘लोकमत’च्या मोहिमेत बालगोपाळही तितक्याच स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले. अनेकांनी आपापल्या सोसायटीत घराघरात जाऊन कपडे गोळा केले आणि ‘लोकमत’ कार्यालयात आणून दिले. झोपडीतल्या मुलांना आपल्यासारखाच खाऊ मिळावा, म्हणून काही मुलांनी बिस्किटचे पुडे आणून दिले.
ट्रॉली भरभरून कपडे
मोहिमेला मिळालेला सातारकरांचा प्रतिसाद इतका अभूतपूर्व होता, की महामार्गावरील वस्त्यांमध्ये वाटण्यासाठी ट्रॉलीतून कपडे न्यावे लागले. मोहिमेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता. कपडे देण्यासाठी महिलांचे शेकडो फोन रोज येत होते. कपडे गोळा करण्यासाठी एका व्यक्तीने तीनचाकी टेम्पो विनामूल्य दिला होता.