सोलापुरात एक लाख लोकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न

By Admin | Updated: January 5, 2017 19:31 IST2017-01-05T19:31:59+5:302017-01-05T19:31:59+5:30

सोलापुरात गुंतवणूक करणाऱ्यांना मी शासनाच्या वतीने संरक्षण देण्याची हमी देतो़ त्यामुळे गारमेंट व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांनी

Trying to provide employment to one lakh people in Solapur | सोलापुरात एक लाख लोकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न

सोलापुरात एक लाख लोकांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न

> ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 5 - सोलापुरात गुंतवणूक करणाऱ्यांना मी शासनाच्या वतीने संरक्षण देण्याची हमी देतो़ त्यामुळे गारमेंट व्यवसायात गुंतवणूक करणाऱ्यांनी लूटमार न करता व्यवसाय वाढवावा़ येत्या काळात सोलापुरात एक लाख लोकांना रोजगार देण्याचे प्रयत्न सुरू असून यासाठी मफतलाल ग्रुपने सोलापूरला दत्तक घेतल्याची घोषणा वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी केली़
श्री सोलापूर रेडिमेड कापड उत्पादक संघ आणि शासनाच्या वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने सोलापुरात आयोजित केलेल्या पहिल्या शालेय गणवेश व वस्त्र प्रदर्शनाचे उद्घाटन करताना देशमुख बोलत होते़ यावेळी व्यासपीठावर पर्यटन मंत्री विजयकुमार रावल, माजी आमदार शिवशरण पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, वस्त्रोद्योग खात्याचे प्रधान सचिव उज्ज्वल उके, संचालक संजय मीना, बँक आॅफ महाराष्ट्राचे सिईओ रविंद्र मराठे, नगरसेवक नागेश वल्याळ, रेडीमेड उत्पादक संघाचे नीलेश शहा, रामवल्लभ जाजू आदी उपस्थित होते़ 
देशमुख म्हणाले की, वस्त्रोद्योग खात्याचा पदभार घेतल्यानंतर सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचा अभ्यास केला़ विडी उद्योग आणि यंत्रमाग उद्योग अडचणीत असल्यामुळे त्याला गारमेंट व्यवसाय एक पर्याय होऊ शकतो म्हणून गारमेंट प्रदर्शन घेण्यासाठी वस्त्रोद्योग खात्याने पुढाकार घेतला़  २००४ साली तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सोलापूरच्या नरसिंग गिरजी मिलच्या ठिकाणी गारमेंट पार्क उभारण्यासाठी ६०० कोटींचा निधी जाहीर केला होता मात्र सहा लाख देखील आले नाहीत़ सवंग लोकप्रियेसाठी अशा घोषणा केल्या केल्या़ मी मात्र नरसिंग गिरजी मिलच्या जागेवर गारमेंट पार्क उभारणा आहे़ सर्व प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून २६ जानेवारी रोजी भूमीपूजन करण्याचे नियोजन केले आहे मात्र आचारसंहिला लागू झाल्यानंतर निवणुकीनंतर भूमीपूजन केले जाईल़ युनिफॉर्म तयार करणे आणि गारमेंट हा उद्योग सोलापुरात चांगला सुरू आहे त्यामुळे याचे परदेशात प्रदर्शन घ्यावे शासन सहकार्य करेल तसेच मफतलाल उद्योग समुहाने सोलापूरच्या गरीब कामगारांना दत्तक घ्यावे असे मत  त्यांनी मांडले आणि मफतलाल यांनी त्यास मान्यता दिली़ सोलापूरला गतवैभव प्राप्त करुन देऊ असे देशमुख म्हणाले़ 
तीन दिवस हे प्रदर्शन बालाजी सरोवर मध्ये आयोजित केले असून यामध्ये देशभरातील उद्योजक सहभागी झाली आहेत़ सोलापूर शहरात तयार होणाºया विविध गारमेंट तसेच युनिफॉर्म तयार करणाऱ्या व्यावसायिकांचे ८२ स्टॉल्स या प्रदर्शनात भरविण्यात आले आहेत़  या प्रदर्शनात देशभरातील उद्योजकच नव्हे तर परदेशातील देखील १३ पाहुणे सहभागी झाले आहेत़ शनिवारपर्यंत हे प्रदर्शन चालणार आहे़ सोलापूरची शान आणि सोलापूरचे मार्केटींग करण्यासाठी खूप छान पध्दतीने हे प्रदर्शनात मांडणी करण्यात आली आहे़  
सोलापूरला टेक्सटाईल्स मुझियम-रावल
टेक्सटाईल्स उद्योग काळाबरोबर बदलला नाही त्यामुळे अडचणीत सापडला़ आता सोलापुरात गारमेंट आणि कापड उद्योगातील साखळी तयार करण्याचे काम सुरू आहे़ मुख्यमंत्री रत्नपारखी आहेत म्हणूनच त्यांनी सोलापूरच्या सुभाष देशमुखांकडे वस्त्रोद्योग खाते दिले़ आता सोलापूरचे गतवैभव प्राप्त होईल़ सोलापूरचे केटरिंग कॉलेज देखील झाले आहे आता या टेक्सटाईल्सचा इतिहास समजण्यासाठी सोलापुरात टेक्सटाईलचे एक दाखल उभे करु असे आश्वासन पर्यटन मंत्री विजयकुमार रावल यांनी दिले़ हॉटेल उद्योग, टेक्सटाईल्स आणि पर्यटन वाढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे त्यांनी सांगितले़
 
मफतलालसाठी सोलापूर महत्त्वाचे शहर
सोलापूर हे आंध्र, कर्नाटक यांच्या जवळ असलेले महाराष्ट्रातील एक शहर असून इथे मोठ्या प्रमाणावर युनिफॉर्म तयार केले जातात़ कापड पुरविठा करणारी मफतलाल ही देशातील अग्रगण्य कंपनी असून आमच्यासाठी सोलापूर हे खूप महत्त्वाचे शहर असल्याचे मत मफतलाल इंडस्ट्रिजचे ऋषीकेश मफतलाल यांनी व्यक्त केले़ गारमेंट डिझाईन टीम मफतलालकडे आहे़ आम्ही वारंवार दर्जाकडे लक्ष देत असतो़ सोलापूरच्या गारमेंट उद्योगाला सहकार्य करु या प्रदर्शनातून अनेकांना फायदा होईल़
 
 

Web Title: Trying to provide employment to one lakh people in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.