‘तीर्थ विठ्ठल’ विशेषांकाचे चंद्रभागा पात्रात प्रकाशन
By Admin | Updated: July 10, 2014 01:32 IST2014-07-10T01:32:32+5:302014-07-10T01:32:32+5:30
‘लोकमत’चा अभिनव प्रकाशन सोहळा : चंद्रभागा प्रदूषणमुक्तीची हाक

‘तीर्थ विठ्ठल’ विशेषांकाचे चंद्रभागा पात्रात प्रकाशन
पंढरपूर: ‘माझी चंद्रभागा, राखू तिची निगा...!’ पवित्र चंद्रभागा नदीच्या प्रदूषणमुक्तीचा असा संदेश देऊन ‘लोकमत’ने आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त काढलेल्या ‘तीर्थ विठ्ठल’ या विशेषांकाचे आज चंद्रभागेच्या पात्रात होडीमध्ये अभिनव पद्धतीने प्रकाशन करण्यात आले. विदर्भ, खान्देश, मराठवाडा, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रातिनिधिक वारकऱ्यांच्या हस्ते हा अनुपम सोहळा झाला.
‘तीर्थ विठ्ठल’चे प्रकाशन करण्यासाठी एकनाथ चिंतामण पाटील (रा. चिंचोली, ता. यावल, जि. जळगाव), गणपती हरिभाऊ पुरी (रा. पैठण, जि. औरंगाबाद), नरेंद्र बाबुराव जाधव (रा. धुळे), हणुमंत नामदेव पवार (रा. लातूर) आणि भागवत पवार (रा. जामखेड, जि. नगर) या वारकऱ्यांना निमंत्रित करण्यात आले. एका होडीमध्ये या वारकऱ्यांना आसनस्थ करून चंद्रभागेच्या पवित्र पात्रात या वारकऱ्यांच्या हस्ते अंकाचे लोकार्पण झाले.
चंद्रभागेच्या तीरावर ‘लोकमत’ या अभिनव उपक्रमाबद्दल कमालीची उत्सुकता होती. हा सोहळा अनुभवण्यासाठी चंद्रभागा स्नानासाठी आलेले वारकरी खास थांबलेले होते. शेजारीच असलेल्या इस्कॉनच्या मंदिरातील भाविकांनीही ‘लोकमत’च्या या आगळ्या सोहळ्यास उपस्थिती लावली. चंद्रभागा नदीच्या प्रदूषणासाठी ‘लोकमत’ने जनतेला दिलेल्या संदेशाची आणि जनजागरण चळवळीची प्रशंसा केली. वाल्मिकी संघटनेचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी आपल्या होड्या देऊन या उपक्रमात सहभाग घेतला.
‘लोकमत’चे संपादक राजा माने, सहा. सरव्यवस्थापक रमेश तावडे यांच्या हस्ते प्रकाशन सोहळ्यासाठी आलेल्या राज्यातील विविध विभागातील वारकरी आणि अंकुशराव यांचा सत्कार करण्यात आला