तारदाळच्या माळरानावर ‘तेलताड’
By Admin | Updated: November 25, 2014 00:00 IST2014-11-24T23:51:58+5:302014-11-25T00:00:54+5:30
फुलविला मळा : तेलताड वनस्पतीपासून पामतेलाचे उत्पादन

तारदाळच्या माळरानावर ‘तेलताड’
आयुब मुल्ला - खोची -सध्या पामतेलाचा स्वयंपाकात मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. मलेशिया आणि इंडोनेशिया हे दोन देश तेलताड व पामतेल उत्पादनाबाबत जागतिक पातळीवर अग्रेसर राहिले आहेत. त्यांची अर्थव्यवस्था या तेलाच्या निर्यातीवर अवलंबून आहे. भारतात रेशनकार्डवर धान्य दुकानात मिळणारे पामतेल म्हणजेच तेलताड या वनस्पतीपासून काढलेले खाद्यतेल होय.
या पामतेलाचे महत्त्व भारतातील गृहिणींनी ओळखले असले तरी त्याच्या उत्पादनाचे महत्त्व मात्र हातकणंगले तालुक्यातील तारदाळ या छोट्या खेड्यातील एका अल्पशिक्षित महिलेने ओळखले. मीनाक्षी मदन चौगुले असे या गृहिणीचे नाव. मीनाक्षी चौगुले यांनी तारदाळ येथे सुमारे एक हेक्टर शेतीमध्ये तेलताड वनस्पतीची कोल्हापूर जिल्ह्यात आधुनिक पद्धतीने लागवड करण्यास सुरुवात केली. अल्पशिक्षित महिला शेतीच्या आधुनिकीकरणात अग्रेसर राहत असल्याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. कमी मनुष्यबळ, कमी खर्च, आंतरपिकातून नियोजनबद्ध मोठे उत्पन्न अशा नियोजन पद्धतीने त्यांनी फुलविलेला हा लागवडीचा मळा स्वादिष्ट असा ठरला आहे.
तारदाळच्या माळरानावर चौगुले यांची एकत्रित शेती आहे. ऊस, द्राक्षे यांचेही प्रयोग शेतीत केले जातात. येथे शेततळे आहे. अशी शेतीची आवड असणारे पती-पत्नी नेहमीच उपक्रमशीलतेला प्राधान्य देतात. गेल्या पंधरा-वीस वर्षांपासून त्यांची ही परंपरा आहे.
पामतेल या जेवणासाठी उपयुक्त ठरणाऱ्या शेतीचा एक गृहिणी म्हणून चौगुले यांनी अभ्यास केला. एक हेक्टर शेतीची नांगरट करून क्षेत्र तयार केले. नऊ बाय नऊ फुटांच्या अंतरावर झिगझॅग पद्धतीने रोपांची लावण केली. यासाठी दोन बाय दोन फुटांचे खड्डे काढून त्यांमध्ये गांडूळ व सुपरफॉस्फेट खत मिसळले. हळूहळू रोपांची वाढ होत गेली. गेले तीन वर्षांच्या कालावधीत त्यांनी केळी, कांदा, झेंडू ही आंतरपिके घेतली. त्यानुसार चार लाख रुपयांचे उत्पन्न निघाले. संपूर्ण क्षेत्राला ठिबकद्वारे पाणी दिले जाते. वर्षाला मशागतीसाठी तीन हजार रुपये इतका खर्च येत आहे.
आता येत्या महिन्यात तेलताड बियाणे उत्पादनास सुरुवात होईल. कारण सुमारे चार वर्षांनंतरच उत्पादनास सुरुवात होते. त्यानंतर मात्र ३५ वर्षांपर्यंत ते सुरू राहते. चौगुले यांनी या कालावधीसाठी व बाजारपेठेत उत्पादन नेण्यासाठी गोदरेज कंपनीबरोबर करार केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पामतेलाच्या दरावर आधारित ही कंपनी दर देणार आहे. या कामाची दखल घेऊन राज्य शासनाने चौगुले यांना
नुकताच जिजामाता कृषिभूषण पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले आहे.
नावीन्यपूर्ण प्रयोगाची कष्ट करण्याची जिद्द
नववीपर्यंत शिक्षण झाले असताना पती मात्र बी.एस्सी. अॅग्रिकल्चर असल्याने त्यांना मार्गदर्शनासाठी चांगला उपयोग झाला आहे. वर्षाला एकरी ३५ हजारांपर्यंतचे निव्वळ उत्पादन देणारे हे पीक आहे. या शेतीसाठी सुरक्षितता, हमखास उत्पादन, कमीतकमी मजूर ही जमेची बाजू आहे, असेही चौगुले यांनी सांगितले. सौ. मीनाक्षी चौगुले यांना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने गतवर्षी ‘कृषी’ पुरस्काराने सन्मानित केले आहे, तर मदन चौगुले यांना राज्य शासनाचा विभागीय पातळीवरचा शेतीनिष्ठ पुरस्कारही मिळालेला आहे. त्यामुळे या दोघांच्या शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगाची कष्ट करण्याची जिद्द प्रचंड आहे, हे स्पष्ट होते.
तेलताड लागवडीचा प्रयोग करण्याचा निर्णय सौ. चौगुले यांनी धाडसाने घेतला. मुळातच तेलताड हे बहुवर्षीय नगदी पीक आहे. राज्यात त्याचा फारसा परिचय नाही. तरीसुद्धा चौगुले यांनी जिल्ह्यात सर्वप्रथम लागवड करण्याचा निर्णय घेतला. या लागवडीपासून निर्माण होणारी फळे ही पामतेल या खाद्यतेलाची निर्मिती करतात.
लवकरच म्हणजे झाडे मोठी झाल्याने सावलीत घेण्यासारखी मसाल्याची लवंग, मिरी, दालचिनी, वेलदोडे ही पिकेही घेण्यात येणार आहेत. तेलताडचा प्रयोग लागवड पाहता यशस्वी झाला आहे, असेच म्हणावे लागेल. कारण त्याची वाढ व फलधारणा वेळेनुसार होत आहे. त्यासाठी आवश्यक ती खतांची मात्राही दिली जाते. तीन वर्षांनंतर गोदरेज कंपनीच्या मार्गदर्शनानुसार नियोजन केले जाणार आहे. या संपूर्ण क्षेत्रात मलेशियन पाम जातीची १४३ रोपे प्रारंभी लावण्यात आली. अत्यंत धाडसाने पण नावीन्यपूर्ण प्रयोग केल्याचे समाधान आहे.
- सौ. मीनाक्षी चौगुले
मलेशिया व इंडोनेशिया हे दोन देश तेलताड व पामतेल उत्पादनाच्या बाबतीत जगात अनुक्रमे पहिल्या, दुसऱ्या क्रमांकांवर आहेत. यांची अर्थव्यवस्था या तेलाच्या निर्यातीवरच अवलंबून आहे. भारतात रेशनकार्डवर स्वस्त धान्य दुकानात मिळणारे पामतेल म्हणजेच तेलताडापासून काढलेले खाद्यतेल होय...