मेंबरकीसाठी गावगाड्यात फिल्डिंग होणार टाईट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:29 IST2020-12-30T04:29:09+5:302020-12-30T04:29:09+5:30
माळशिरस : ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या वेळी थेट सरपंचाची निवडणूक पद्धती रद्द झाली व ...

मेंबरकीसाठी गावगाड्यात फिल्डिंग होणार टाईट
माळशिरस : ग्रामीण भागात ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. या वेळी थेट सरपंचाची निवडणूक पद्धती रद्द झाली व नव्या निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार आहे. यामुळे प्रभागानुसार सदस्य पदासाठी होणाऱ्या निवडणुकांवर पुढे सरपंच पदाचे राजकीय समीकरण अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांना वेगळे महत्त्व प्राप्त होणार आहे. त्यामुळे साहजिकच गावगाड्यात मेंबर पदासाठी फिल्डिंग टाईट होणार आहे.
थेट सरपंच पदाच्या निवडीच्या काळात सदस्य पदाचे महत्त्व घटले होते. नेहमीच्या पद्धतीनुसार सरपंच पदाचा उमेदवार फिक्स केल्यामुळे सदस्यांमधील चुरस कमी प्रमाणात पाहायला मिळत होती. अनेक गावांमध्ये बिनविरोध सदस्य निवडून येण्याचे प्रमाणही वाढले होते. मात्र या वेळची परिस्थिती वेगळी आहे. सरपंच पदासाठी कोणत्याही उमेदवाराची लॉटरी लागू शकते. त्यामुळे सध्या गावगाड्यात मेंबरच्या निवडणुकीसाठी अनेक गावांमध्ये चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे.
बहुमत व सरपंच पदाचा ताळमेळ
बहुतांश गावात दुरंगी लढती आढळतात. यात कधी कधी एका पार्टीचे मेंबर जादा आले तर आरक्षित सरपंच उमेदवार त्यात असेलच असे नाही. त्यामुळे नाइलाजाने दुसऱ्या पार्टीचा सरपंच स्वीकारावा लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक घटकाचा उमेदवार सदस्य पदासाठी ताकद लावणार आहे.