आंबोलीत दरड कोसळून तीन महिला जखमी
By Admin | Updated: August 6, 2015 23:12 IST2015-08-06T23:12:45+5:302015-08-06T23:12:45+5:30
जखमी सोलापूरचे : पर्यटकांच्या गाडीचेही नुकसान

आंबोलीत दरड कोसळून तीन महिला जखमी
आंबोली : आंबोलीच्या मुख्य धबधब्यापाशी गुरुवारी पुन्हा दरड कोसळली. यातील दोन दगड स्टॉलच्या ठिकाणी कोसळले. यापैकी मोठा दगड सोलापूरहून ट्रॅक्सने आंबोलीत पर्यटनासाठी आलेल्या गाडीवर आदळला. यामध्ये गाडीचा दरवाजा तुटून तीन महिला जखमी झाल्या. ही घटना गुरुवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली.
सोलापूरहून नऊ पर्यटक ट्रॅक्स करून आंबोली धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी आले होते. पहाटे निघालेल्या पर्यटकांनी आंबोलीत दुपारी प्रवेश केला. त्यांनी गाडी धबधब्याच्या नजीक थांबविली. ते गाडीतून उतरण्याच्या तयारीत असतानाच अचानक दरडीतून आलेला मोठा दगड त्यांच्या गाडीवर आदळला.
यावेळी गाडीतील तिघींना दुखापत झाली. ही घटना मुख्य धबधब्याच्या ठिकाणी असणाऱ्या स्टॉलजवळच घडल्याने येथे क्षणार्धात मोठी गर्दी झाली. दगड बाजूला करून गाडी तत्काळ पुढे नेण्यात आली. जखमींवर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लजकडे नेण्यात आले.
दरम्यान, गेल्या महिन्याभरात गाडीवर दगड पडण्याची ही
तिसरी वेळ असून, दोन घटनांमध्ये वाहनांचेच नुकसान झाले
होते. यावेळी वाहनामधील प्रवाशांनाही दुखापत झाली आहे. (वार्ताहर)