डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीने घेतला पेट तिघांचा होरपळून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:46 IST2021-02-05T06:46:06+5:302021-02-05T06:46:06+5:30
डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीसह तिघेही खाली पडले आणि दुचाकीवरील ...

डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीने घेतला पेट तिघांचा होरपळून मृत्यू
डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीला दुसऱ्या भरधाव दुचाकीस्वाराने धडक दिली. यामध्ये डिझेल घेऊन जाणाऱ्या दुचाकीसह तिघेही खाली पडले आणि दुचाकीवरील डिझेलने पेट घेतला. यामध्ये तिघांचाही होरपळून मृत्यू झाला. नातेपुते-दहिगाव रस्त्यावर १ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० च्या दरम्यान ही घटना घडली.
याबाबत सागर कल्याण मदने यांनी नातेपुते पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिरळे (ता. माळशिरस) येथील दीपक विठ्ठल बुधावले (वय २५) व विशाल शशिकांत बुधावले (वय २४) हे दोघे (एमएच ४२/एवाय ६९४३) दुचाकीवरून शेती नांगरणाऱ्या ट्रॅक्टरसाठी प्लॅस्टिकच्या कॅनमध्ये डिझेल घेऊन घराकडे जात होते.
दरम्यान दहिगावहून भरधाव येणाऱ्या संग्राम रामदास जाधव (वय ३०, रा. हघारेवाडी, ता. इंदापूर) याने त्याच्या ताब्यातील दुचाकी (एमएच ४२/ई ७३९७) विरुद्ध बाजूने येऊन विशाल शशिकांत बुधावले यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यामुळे त्यांच्याजवळील प्लॅस्टिक कॅनमधील डिझेल दुचाकींवर पडले आणि आगीचा भडका उडाला. यामध्ये दोन्ही दुचाकींसह तिघेही या आगीमध्ये होरपळून जखमी होऊन जागेवरच मयत झाले. या तिघांनाही नातेपुते येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी सागर मदणे यांनी फिर्याद मयत संग्राम जाधव याच्याविरुद्ध नातेपुते पोलीस ठाण्यात दिली आहे. तपास पोलीस निरीक्षक मनोज सोनवलकर करीत आहेत.
----