काँग्रेसमधून तिघे बडतर्फ
By Admin | Updated: September 4, 2014 01:00 IST2014-09-04T01:00:19+5:302014-09-04T01:00:19+5:30
तौफिक शेख, अल्लोळी, सय्यद यांचा समावेश

काँग्रेसमधून तिघे बडतर्फ
सोलापूर : पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे शहराध्यक्ष तौफिक शेख, मनपा परिवहनचे माजी सभापती इम्तियाज अल्लोळी, सदस्य कोमारो सय्यद यांना काँग्रेस पक्षातून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात राहून पक्ष विरोधात बैठका घेणे व इतर पक्षांकडे उमेदवारी मागणे याबाबतच्या तक्रारी वाढल्यामुळे ही कारवाई केल्याचे यलगुलवार यांनी स्पष्ट केले. मनपातील सभागृह नेते महेश कोठे व माजी महापौर नलिनी चंदेले यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सेना व भाजपात प्रवेश केला. प्रदेश अध्यक्षांकडे याबाबत अहवाल पाठवून या दोघांना यापूर्वीच बडतर्फ करण्यात आले आहे. तौफिक शेख यांनी शहर मध्यमध्ये उमेदवारीची मागणी केली. तत्पूर्वीच त्यांनी पक्षविरोधात बैठका घेतल्या. इतर पक्षांकडे उमेदवारीची मागणी केली व अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय जाहीर केला. अशीच तक्रार अल्लोळी व सय्यद यांच्याबाबतीत आल्यावर ही कारवाई करण्यात आली. ६ सप्टेंबर रोजी महापौर, उपमहापौर पदाची निवडणूक आहे. महापालिकेत काँग्रेसचे ४४ तर राष्ट्रवादीचे १६ सदस्य आहेत. कोठे यांच्या फुटीचा या निवडणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून काँग्रेसने खबरदारी घेतली आहे. सर्व नगरसेवकांना संपर्कात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांना सदस्य सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. देवेंद्र कोठे यांनी पक्षाचा व्हीप मंगळवारी उशिरापर्यंत स्वीकारलेला नव्हता तर नाराज सदस्यांच्या संपर्कात महेश कोठे असल्याचे सांगण्यात आले.