रात्री झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; सकाळी उठवताना तो उठलाच नाही
By विलास जळकोटकर | Updated: March 27, 2024 19:01 IST2024-03-27T19:01:34+5:302024-03-27T19:01:57+5:30
उपचारापूर्वीच मृत्यू, डॉक्टरांनी केलं घोषित

रात्री झोपेतच हरवला तरुणाचा श्वास; सकाळी उठवताना तो उठलाच नाही
सोलापूर : रात्री उशिरापर्यंत कुटुंबासमवेत जेवण आटोपून गप्पा मारुन झोपलेल्या तरुणाला बुधवारी सकाळी सातच्या पत्नीनं उठवण्याचा प्रयत्न केला मात्र तो उठलाच नाही. तातडीनं दवाखान्यात हलवलं मात्र डॉक्टरांनी त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं निदान केलं.
शहरातील म्युन्सिपल कॉलनीमध्ये ही घटना उघडकीस आली. गोविंद व्यंकटय्या बोनासे (वय- ३७) असे या तरुणाचे नाव आहे. यातील मयत गोविंद बोनासे हे रात्रीच्या सुमारास दैनंदिन काम आटोपून कुटुंबासमवेत जेवण आटोपले. रात्री ११ च्या सुमारास ते झोपी गेले. सकाळी ७ च्या सुमारास पत्नी इंदिरा यांनी त्यास उठवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यानी काहीच हालचाल केली नाही. भावानेही उठवण्याचा प्रयत्न केला. तातडीने सकाळी ८ च्या सुमारास भाऊ कृष्णा याने येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी बेशुद्धावस्थेत दाखल करण्यात आले. येथे डॉ. विजय सुरवसे यांनी तपासले असता त्यांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेची सिव्हील पोलीस चौकीत नोंद झाली आहे.