दाभोळकरांच्या खुनचा निकाल अर्धाच लागतो ही शोकांतीका : माजी आमदार नरसय्या आडम
By संताजी शिंदे | Updated: June 8, 2024 18:04 IST2024-06-08T18:03:13+5:302024-06-08T18:04:32+5:30
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकारणी बैठकीचे उद्घाटन

दाभोळकरांच्या खुनचा निकाल अर्धाच लागतो ही शोकांतीका : माजी आमदार नरसय्या आडम
संताजी शिंदे
सोलापूर : शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते. जादुटोणा विरोधी कायदा मंजूर होण्यासाठी मी त्यांच्या सोबत काम केले. त्यांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल लागायला ११ वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाही मधली शोकांतिका आहे, असे मत माजी आमदार नरसय्या आडम यांनी व्यक्त केली.
हिराचंद नेमचंद कार्यालयात आयोजित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी नरसय्या आडम बोलत होते. यावेळी मंचावर अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, निळकंठ जिरगे, नंदिनी जाधव, मुंजाजी कांबळे, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, प्रकाश घादगिने, गणेश चिंचोले उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन हे अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचा 'डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांक' प्रकाशन करून करण्यात आले.
यावेळी प्रसंगी बोलताना आडम पुढे म्हणाले की, मनुस्मृती ची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांची सध्या चलती आहे. अशा कालखंडात लोकांना शहाणे करण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल. ज्या देशात ज्योतिषांच्या सांगण्यावरून शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणूक अर्ज देखील मुहूर्त बघून भरले जातात. अशा समाजात आपली लढाई चालू आहे. हजारो वर्षे शोषण करणाऱ्या व्यवस्थे विरुध्द आपली लढाई आहे, पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या मध्ये जसे लोकांनी राज्य घटना बदलू इच्छिणाऱ्या लोकांना धडा शिकवला. त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले. स्वागत उषा शहा यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. सूत्रसंचालन अस्मिता बालगावकर यांनी तर प्रा. अशोक कदम यांनी आभार मानले.