सोलापूर : सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना घडली असून पतीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी पत्नीनेही आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे. शहरातील भगवान नगर झोपडपट्टीत पेंटर असलेल्या कलाकार तरुणाने व्हॉट्सअॅपवर सेल्फी काढून त्याखाली 'सॉरी हर्ष, माऊ' अशी माफी मागत ऐन पाडव्याच्या रात्री ११:१५ च्या सुमारास ओढणीने गळफास घेऊन अखेरचा श्वास घेतला. त्याचा अंत्यविधी होते न होते तोच दुसऱ्या दिवशी रात्री १२:३० च्या सुमारास पत्नीला पतीच्या जाण्याच्या विरह सहन झाला नाही. तिनेही त्याच ठिकाणी साडीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
एक दिवसाच्या फरकाने या दोन्ही घटना पोलिस मुख्यालयाच्या शेजारी असलेल्या भगवान नगर झोपडपट्टीतील सार्वजनिक पाण्याच्या टाकीला असलेल्या लोखंडी शिडीच्या अँगलला गळफास घेऊन झाल्या. विनायक बाबूराव पवार (वय ३१) आणि पूजादेवी विनायक पवार (वय २५, दोघे भगवान नगर झोपडपट्टी, सोलापूर) अशी त्यांची नावे आहेत. क्षणिक रागाच्या आवेषातून दोघांचे प्राण गेले, मात्र यामुळे आठ वर्षांचा हर्ष आणि चार वर्षाची महालक्ष्मी ही चिमुकले मात्र आई-वडिलांविना पोरकी झाली. यातील पाडव्यादिवशी आत्महत्या केलेला विनायक पवार तसा हरहुन्नरी तरुण. पेंटिंगची कामे करायचा. त्याने अन्य भावांनाही या कलेत पारंगत केले. दोघा पती-पत्नीमध्ये कुरबुरी व्हायच्या, मात्र त्या तेवढ्यापुरत्याच. दोघेही एकमेकांशिवाय राहायचे नाही. घटनेपूर्वी झालेल्या भांडणातून दोघांनाही आपला जीव गमावावा लागेल, असे कधीच वाटले नाही, अशा भावना मयत विनायकचा भाऊ आणि पूजादेवीचा दीर विशाल पवार यांनी डोळ्यांतील अश्रूंना लपवत व्यक्त केल्या.
कडी लावून बाहेर पडली अन् घात झाला
पाडव्याच्या रात्री भाऊ विनायक याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सोमवारी दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सारे नातलग दुःखात होते. वहिनी पूजादेवीवर महिला नातलग लक्ष ठेऊन होते. रात्रीच्या वेळी सर्वांची नजर चुकवून वहिनी पूजादेवी बाहेर पडली. बाहेरून दरवाजाला कडी लावली. आजूबाजूच्या घरांनाही कडी लावून तिनेही माझ्या भावाने जिथे गळफास घेतला तिथेच गळफास घेऊन पतीचा विरह सहन झाल्याने आपलाही शेवट केल्याचे विशाल पवार यांनी सांगितले.
नात्यातच झाले होते लग्न
यातील मयत विनायक आणि पूजादेवी यांचे लग्न नात्यातच झालेले होते. मामाची मुलगी पूजादेवीशी विनायकचे लग्न झाले होते. दोघांच्या जाण्याने हर्ष आणि महालक्ष्मी ही दोन चिमुकले अनाथ झाली आहेत. यातील आठ वर्षांचा हर्ष हा प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरीत शिकत आहे. चार वर्षांची महालक्ष्मी याच शाळेत लहान गटात शिकत असल्याचे सांगण्यात आले.