मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी 'व्हॉल्व्ह'वर बंद... पाणी सोडता न आल्यानं यात्रेदिवशी उशिरा स्नान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2023 15:05 IST2023-07-01T15:05:03+5:302023-07-01T15:05:27+5:30
गुरुवारी आषाढी एकादशी होती. यामुळे शासकीय महापुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल मंदिरात आले होते.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडी 'व्हॉल्व्ह'वर बंद... पाणी सोडता न आल्यानं यात्रेदिवशी उशिरा स्नान...
पंढरपूर : ऐन एकादशी सोहळ्यादिवशी मुख्यंमत्र्यांच्या ताफ्यातील एका व्हीआयपीची गाडी चौफाळा येथील हॉटेल समोर बंद पडली होती. ही गाडी पाण्याचा 'व्हॉल्व्ह' असलेल्या ठिकाणी बंद पडल्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्याला 'व्हॉल्व्ह' फिरवता आला नाही. परणामी त्या मंदिर परिसरातील नागरीकांना ऐन एकादशी दिवशी उशिरा स्नान करावे लागले.
गुरुवारी आषाढी एकादशी होती. यामुळे शासकीय महापुजा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विठ्ठल मंदिरात आले होते. त्यांच्याबरोबर अनेक मंत्री, आमदार व इतर व्हीआयपी देखील आले होते. मंदिरात विठ्ठलाची शासकीय महापुजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यानंतर ते पहाटे साडे पाच च्यासुमारास मंदिरातून बाहेर पडले. यावेळी त्यांच्या बरोबर इतर गाड्या देखील निघाल्या. मात्र यातील एम एच १४ सी पी १ या क्रमांकाची गाडी चौफाळा येथील एका हॉटेल समोर बंद पडली. मंदिर परिसरातील नागरकांच्या घरात पिण्याचे पाणी पुरवठा करणारा पाईपलाईनचा 'व्हॉल्व्ह'च्या जागेवर गाडी उभी होती.
गाडीला नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी व इतर लोकांनी पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी लॉक असल्याने गाडी पुढे गेली नाही. तसेच ही गाडी लवकर दुरुस्त देखील झाली नाही. ही गाडी 'व्हॉल्व्ह'वरच उभी होती. यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना 'व्हॉल्व्ह' देखील फिरवता येईना. त्यामुळे मंदिर परिसरातील नागरीकांना ऐन आषाढी एकादशी सोहळ्या दिवशीच उशीरा स्नान करावे लागले.
त्याचबरोबर प्रदक्षिणा मार्गावरुन येणाऱ्या दिंड्यांना देखील त्या गाडीमुळे अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र नगरपरिषदेचे सह मुख्याधिकारी सुनिल वाळुजकर व पाणी पुरवठा विभागातील भुषण घोडके यांनी त्याठिकाणी पहाटे ६ वाजल्यापासून ते सकाळी साडे नऊ वाजेपर्यंत तेथे थांबून पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच दुरुस्ती केली. यामुळे मंदिर परिसरातील नागरीकांना साडे नऊच्या पुढे पिण्याचा पाण्याचा पुरवठा झाला. संबंधीत गाडीच्या कंपनीचा मॅकेनिकल आल्यानंतर त्याने ती गाडी सुरु केली.