हरणांच्या सुरक्षेसाठी हायवेवर दहा फूट जाळीचे आवरण; धरणे आंदोलनानंतर घेतली दखल
By विलास जळकोटकर | Updated: March 24, 2023 15:57 IST2023-03-24T15:57:30+5:302023-03-24T15:57:45+5:30
एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते.

हरणांच्या सुरक्षेसाठी हायवेवर दहा फूट जाळीचे आवरण; धरणे आंदोलनानंतर घेतली दखल
सोलापूर - विजयपूर महामार्गावर दोन महिन्यापूर्वी १२ काळविटांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेनंतरही दखल घेतली नसल्याने धरणे आंदोलन छेडताच हायवेवर पुलाच्या दोन्ही बाजूस दोन फूट कठडा आणि आठ फूट आवरण असलेली जाळी बसवण्याच्या कामास सुरुवात झाली आहे.
सोलापूर - विजयपूर महामार्गावर पूणेरोड केगाव ते हत्तूर बायपास चार पदरी रिंगरोड तयार करण्यात आला आहे. या महामार्गावर केगाव येथील देशमुख वस्तीजवळ अंडरपासवर २८ जानेवारी रोजी संध्याकाळी १५ काळवीट पुलावरून खाली पडून १२ काळविटांचा जागीच मृत्यू तर दोन काळविटांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. एक काळविटावर पुण्यात उपचार सुरु आहेत. या घटनेचे सोलापूर व राज्यात तीव्र पडसाद उमटले होते. सोलापुरातील विविध पर्यावरण संस्थांनी याबाबत निषेध व्यक्त केला होता. तर नागरिकांनी चौकाचौकात श्रद्धांजली सभा घेतल्या होत्या. घटनेची चौकशी करुन कारवाई करन्यासाठी जीआयबी फाउंडेशन आणि डब्लूसीएएस या संस्थाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते.
धरणे आंदोलनानंतर दखल
घटनेची चौकशी करुन तातडीने केद्रसरकारच्या वने व हवामानबदल विभागास अहवाल सादर करणे करीता अप्पर प्रधान वन्यजीवरक्षक पश्चिम विभाग मुंबईचे श्री बेन यांनी घटना स्थळी भेट दिली होती. या घटनेनंतर दोन महिने उलटूनही कोणत्याही प्रकारचे ठोस कारवाई किंवा उपाययोजना झाली नसल्याने १५ मार्च २०२३ रोजी जे आयबी फाउंडेशनच्या वतीने उपवनसंरक्षक सोलापूर वनविभाग प्रादेशीक यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात डब्लू सी ए एस, वाईल्डलाईफ केअर संस्थेच्या सदस्स्यांनी भाग घेतला होता.
या आंदोलनाची दखल घेऊन चारच दिवसात धरणे आंदोलनात मागणी केलेल्या हरणांच्या मृत्यू घडलेल्या ठिकाणी पुलावर जाळीचे आवरण उभारण्याचे काम एन एच ए आय च्या वतीने आयबीएम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून सुरु झाले.
पुलाच्या दोन्ही बाजूने दहा फूट आवरण
दोन फूट उंचीचा कठडा आणि आठ फूट जाळीचे असे एकूणदहा फूट आवरण पूलाच्या दोन्ही बाजूने उभारण्यात येत आहे. या काममाची सुरूवात आज वनपरीक्षेत्र अधिकारी माळढोक पक्षीअभयारण्य नान्नज याच्या हस्ते करण्यात आले. हे काम येत्या २५ ते ३० दिवसात पुर्ण करण्याची योजना आहे.