विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेकडे मंदिर समितीचे दुर्लक्ष
By Admin | Updated: July 30, 2014 01:32 IST2014-07-30T01:32:18+5:302014-07-30T01:32:18+5:30
सीसीटीव्ही कुचकामी : माहिती साठवून ठेवण्याची सोय नाही

विठ्ठल मंदिराच्या सुरक्षेकडे मंदिर समितीचे दुर्लक्ष
पंढरपूर : महाराष्ट्रासह देशभरातून लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला येतात. देशात कुठेही अतिरेकी कारवाई झाल्यास पंढरपूरला हाय अलर्ट जारी केला जातो. असे असतानाही विठ्ठल-रूक्मिणी मंदिराच्या सुरक्षेसाठी बसवलेल्या सी.सी.टी.व्ही़ कॅमेऱ्याचा डाटा जतन करुन ठेवला जात नाही, अशी धक्कादायक माहिती एका न्यायालयीन प्रक्रियेमध्ये उघडकीस आली आहे.
पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत अॅड. कसबे यांनी ही माहिती निदर्शनास आणून दिली. यावेळी अॅड. प्रशांत चिटणीस व रिपाइंचे विद्यार्थी संघटनेचे दीपक चंदनशिवे उपस्थित होते.
अॅड. कसबे म्हणाले, कोल्हापूर येथील सुनील बाळासाहेब घोरपडे हे त्यांच्या मित्रपरिवारासह विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात २२ डिसेंबर २०१३ रोजी दुपारी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत मुखदर्शन रांगेत होते. असे असतानाही त्या दिवशी कोल्हापूर येथे झालेल्या खोट्या गुन्ह्यात त्यांना गोवण्यात आले़ त्यामुळे त्यांनी न्यायालयासमोर ते पंढरपूरमध्ये होते हे सिद्ध करण्यासाठी विठ्ठल मंदिरात दर्शन रांगेत असलेल्या सी. सी. टी.व्ही. फुटेजच्या माध्यमातून रेकॉर्ड केलेली माहिती मिळावी अशी मागणी ३० डिसेंबर २०१३ रोजी विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडे केली होती.
यावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकांनी ही शासन नियुक्त मंदिर समिती आहे़ येथे मंदिराच्या सुरक्षिततेसाठी सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसविलेले आहेत. या कॅमेऱ्यामध्ये दिवसभरात काय घडामोडी होतात, एवढेच जतन केले जाते. सी.सी. टी.व्ही. कॅमेऱ्यांना बॅक-अपची सोय अगर मेमरी कार्ड नाही. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डाटा आमच्याकडे जतन केला जात नाही. त्याचबरोबर दिवसभरामध्ये काही गैरप्रकार आढळून आल्यास त्याच वेळेस तशी प्रतिमा, चित्रीकरण मंदिर समितीचे संबंधित कर्मचारी तेवढ्याच वेळापुरते व कारणापुरते जतन करून ठेवतात. त्यानंतरची प्रतिमा अगर चित्रीकरण आपोआपच नष्ट होते असे उत्तर मंदिर समितीकडून मिळाले असल्याचे अॅड. महेश कसबे यांनी सांगितले.
-------------------------
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज हे विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीची बाब आहे. ही कोणा खासगी व्यक्तीला देता येत नाही. याबाबत आमच्या वकिलांनी न्यायालयात म्हणणे सादर केले आहे.
- एस. एस. विभुते
व्यवस्थापक, विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समिती