पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे तालुक्याच्या नजरा
By Admin | Updated: January 25, 2017 18:22 IST2017-01-25T18:22:53+5:302017-01-25T18:22:53+5:30
पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे तालुक्याच्या नजरा

पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे तालुक्याच्या नजरा
पांगरी जिल्हा परिषद मतदारसंघाकडे तालुक्याच्या नजरा
शहाजी फुरडे-पाटील - बार्शी आॅनलाईन लोकमत
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिल्याने राजकीय हालचाली व गुप्त बैठकांना जोर आला असून, तालुक्यातील लक्षवेधी असलेल्या पांगरी जि़ प़ गटासाठी जातीय समीकरणाचा आधार घेत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी प्रमुख कार्यकर्त्यांमार्फत चाचपणी सुरू केली आहे़ नेहमी काँटे की टक्कर असलेल्या या मतदारसंघात दोन्ही बाजूकडून वंजारी समाजाचे उमेदवार मैदानात उतरवले जातील, असे दिसत आहे़
बालाघाटच्या डोंगररांगा व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या या मतदारसंघात पांगरी व कारी या दोन पंचायत समिती गणांचा समावेश आहे़ सध्या या मतदारसंघातून जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेचे प्रा़ संजय पाटील हे प्रतिनिधित्व करीत आहेत, तर पांगरी पंचायत समिती गणातही शिवसेनेच्या कौशल्या माळी या विजयी झाल्या होत्या़ त्यांनी अडीच वर्षे सभापती म्हणून देखील काम पाहिले, तर कारी गणामध्ये शशिकला खरटमल या राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयी झाल्या होत्या़ मागील जि़ प़ निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी सभापती युवराज काटे व शिवसेनेचे संजय पाटील यांच्यात निकराची झुंज होऊन संजय पाटील ८८ मतांनी विजयी झाले होते़ त्यावेळेस दोन्ही उमेदवारांनी आपल्या गावात विक्रमी मतांची आघाडी घेतली होती़
यावेळी पांगरी जिल्हा परिषद गट ओबीसी महिलेसाठी आरक्षित, पांगरी गण सर्वसाधारण खुला झाला आहे, तर कारी गण हा देखील नागरिकांच्या मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी आरक्षित झालेला आहे़ या मतदारसंघात लढत ही गेल्या वीस वर्षांपासून लक्षवेधीच होत आहे़ तसेच प्रत्येक निवडणुकीत अल्प मतानेच उमेदवार विजयी होत आहे़ १९९७ साली आ़ दिलीप सोपल गटाच्या मंदाताई काळे यांनी २९ मतांनी सविता पाटील यांचा, २००२ साली राष्ट्रवादीच्या रघुनाथ कोल्हे यांनी ९० मतांनी तुकाराम माने यांचा तर २००७ साली शिवसेनेचे संजीव बगाडे यांनी केवळ २७ मतांनी शीतल जानराव यांचा आणि २०१२ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पाटील यांनी राष्ट्रवादीच्या युवराज काटे यांचा ८८ मतांनी पराभव करून विजय मिळविला आहे़ म्हणजेच गेल्या चार निवडणुकीत जि़ प़चा उमेदवार शंभरपेक्षा कमी मतांनी विजयी झाला आहे. यावरून या मतदारसंघात आ़ दिलीप सोपल व माजी आ़ राजेंद्र राऊत या दोन्ही नेत्यांची ताकद समसमान असल्याचे दिसून येते़ मागील पंचायत समिती निवडणुकीत पांगरीतून शिवसेना तर कारीतून राष्ट्रवादीच्या खरटमल विजयी झाल्या होत्या़
---------------------------------
ही आहेत गटातील गावे
पांगरी पंचायत समिती गणात धामणगाव, काटेगाव, चारे, बोरगाव, वालवड, पाथरी, शिराळे, पिंपळवाडी, घारी, पुरी आणि पांगरी तर कारी गणात उक्कडगाव, वाघाचीवाडी, पांढरी, घोळवेवाडी, चिंचोली, ढेंबरेवाडी, जहानपूर, पिंपळगाव दे, धोत्रे, खामगाव, ममदापूर, कारी, येळंब व गोरमाळे या गावांचा समावेश आहे़ यापूर्वीचे कारी गणातील चिखर्डे हे उपळे दुमाला गणात गेले आहेत. उपळेतील गोरमाळे व येळंब ही गावे कारीत आली आहेत़ त्याचा देखील निवडणुकीवर परिणाम होणार आहे़ कारी गणात १५ हजार ९३७, तर पांगरी गणात १७ हजार २१ एवढे मतदान आहे़
----------------------
गेली वीस वर्षे शंभर मतांच्या आतमध्ये विजय
गेल्या वीस वर्षांचा काठावरच्या विजयाचा इतिहास पाहता यंदा देखील या गटासह दोन्ही गणातील निवडणुका अतिशय चुरशीने होणार आहेत. वीस वर्षांत दहा वर्षे सोपल तर दहा वर्षे राऊत गटाची सत्ता राहिली आहे़ दोन्ही नेत्यांबरोबरच राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष युवराज काटे, तालुकाध्यक्ष नंदकुमार काशीद, शिवाजीराव गायकवाड, डॉ़ अरुण नारकर तर शिवसेनेकडून जि़ प़ सदस्य संजय पाटील, माजी सभापती विनायक विधाते, अॅड़ अनिल पाटील, कुंडलिकराव गायकवाड, विनोद काटे यांची प्रतिष्ठादेखील पणाला लागणार आहे़