दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

By Admin | Updated: January 25, 2017 18:16 IST2017-01-25T18:16:36+5:302017-01-25T18:16:36+5:30

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

Taluka head rejects for a rally in South Solapur taluka | दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा

दक्षिण सोलापूर तालुक्यात आघाडीसाठी तालुकाध्यक्षांची नकारघंटा
सोलापूर आॅनलाईन लोकमत
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची दक्षिण सोलापूर तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी आघाडी करण्याला दोन्ही पक्षांच्या तालुकाध्यक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे. तरीही मंद्रुप गटासाठी आघाडी करण्याची तयारी काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.
गेली कित्येक वर्षे दक्षिण सोलापूर तालुक्याच्या राजकारणात काँग्रेसला राष्ट्रवादीनेच सत्तेपासून रोखण्याचा प्रयत्न केला आहे. गतवेळच्या जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने होते. थोडक्यात राष्ट्रवादीची संधी हुकली. यंदा तालुक्यात भाजपाची ताकद वाढत असल्याने दोन्ही काँग्रेससमोर आव्हान उभे ठाकले आहे. काँग्रेस सत्तेबाहेर गेली आहे तर राष्ट्रवादीचे नेतेच पक्षातून बाहेर पडून काँग्रेसच्या आश्रयाला गेले आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसची स्थिती तशी भक्कम राहिली नाही. म्हणूनच आगामी पंचायत समिती, जिल्हा परिषदेत भाजपाला थोपविण्यासाठी आघाडीचा पर्याय पुढे आला होता. त्याला काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुरुसिद्ध म्हेत्रे यांनी खो घातला आहे.
राष्ट्रवादीचे जि. प. कृषी समिती सभापती आप्पाराव कोरे यांनी काँग्रेससोबत जाण्याची तयारी केली आहे. काँग्रेस नेतृत्वाने मंद्रुप जि. प. गट आणि पंचायत समिती गण कोरे यांच्यासाठी सोडणार असल्याची चर्चा आहे. आप्पाराव कोरे यांनी या चर्चेला दुजोरा दिला; मात्र राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बसवराज बगले यांनी एका बाजूने स्वतंत्र लढण्याची घोषणा करीत काही अटींवर काँग्रेससोबत बोलणी सुरू केली आहे. आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी तालुक्याच्या अक्कलकोट मतदारसंघातील कुंभारी, वळसंग, बोरामणी गटात काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात नेत्यांच्या काँग्रेस प्रवेशाने राष्ट्रवादीची ताकद कमी होण्याची शक्यता आहे.
-----------------------------
समान वाटा हवा...
दक्षिण सोलापूर तालुक्यात राष्ट्रवादीचे सध्या दोन जि. प. सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य आहेत. पक्षाची ताकद काँग्रेस बरोबरीने असल्याने आगामी निवडणुकीत ३ जि. प. गट, ७ पंचायत समिती गण सोडण्याची तयारी असेल तरच काँग्रेससोबत चर्चेला बसणार असल्याचे सांगत, आघाडीसाठी होऊ घातलेल्या बैठकीलाच बगले यांनी खो घातला आहे.
-------------------------
राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याबाबत पक्षाचे नेते अजित पवार यांच्याशी माजी आमदार दिलीप माने यांची चर्चा झाली आहे. माजी जि. प. अध्यक्ष बळीराम साठे यांची भूमिका मध्यस्थाची राहणार आहे. दोन्ही पक्षाच्या नेत्यांची बैठक बँकेऐवजी काँग्रेस भवन अथवा राष्ट्रवादी कार्यालयात घेतल्यास आपण चर्चेला जाऊ, असा पवित्रा राष्ट्रवादीचे अध्यक्ष बसवराज बगले यांनी घेतला आहे.
तालुक्यातील राष्ट्रवादीच्या प्रबळ नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने पक्षच संपला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मंद्रुप गट आणि गणात काँग्रेसची ताकद आहे. तो तर मुळीच सोडणार नाही.
-गुरुसिद्ध म्हेत्रे, सभापती तथा
तालुकाध्यक्ष, काँग्रेस कमिटी
---------------
ज्यांनी परस्पर काँग्रेस नेत्यांशी संधान बांधून आघाडी करण्याचा घाट घातला असेल तर त्यांनी खुशाल आघाडी करावी. त्यांचा तो वैयक्तिक निर्णय आहे. दोन्ही तालुक्यातील काँग्रेस नेत्यांनी सन्मानपूर्वक बोलावले तरच चर्चेला जाऊ.
- डॉ. बसवराज बगले
तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

Web Title: Taluka head rejects for a rally in South Solapur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.