भाजपा आनंदोत्सवाची सुभाष बापूंकडून फुगडी !
By Admin | Updated: February 25, 2017 22:14 IST2017-02-25T22:14:12+5:302017-02-25T22:14:12+5:30
महापालिकेत भाजपचे तब्बल ४९ नगरसेवक निवडून आल्याबद्दल प्रदेश भाजपकडून प्रत्येक शहरात जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता

भाजपा आनंदोत्सवाची सुभाष बापूंकडून फुगडी !
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 25 - भारतीय जनता पार्टीचा विजय असो...मुख्यमंत्र्यांचा विजय असो...हमसे जो टकरायेगा मिठ्ठी मे मिल जागेया...भारत माता की जय...अशा विविध घोषणा देत सोलापूर शहर भाजपाने शनिवारी सायंकाळी जल्लोष केला. यावेळी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी फुगडी खेळून आनंदोत्सव साजरा केला. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी मात्र याकडे पाठ फिरविली.
महापालिकेत भाजपचे तब्बल ४९ नगरसेवक निवडून आल्याबद्दल प्रदेश भाजपकडून प्रत्येक शहरात जल्लोष कार्यक्रम आयोजित केला होता. प्रारंभी कार्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी यांनी मनोगत व्यक्त केले तर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी देखील नगरसेवकांना सूचना दिल्या. तत्पूर्वी नव्याने निवडूण आलेल्या नगरसेविका संगीता जाधव यांनी मनोगत व्यक्त केले़ जल्लोष कार्यक्रमाच्या वेळी संगीता जाधव यांच्यासह शोभा बनशेट्टी, राजश्री चव्हाण यांनी फुगडीचा फेर धरला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी आग्रह धरल्यामुळे सुभाष देशमुख यांनी भाजपा कार्यकर्ते राजेंद्र प्रसाद गड्डम यांच्याबरोबर फुगडी खेळून आनंद साजरा केला. घोषणाबाजी, फटाके फोडणे, फुगडी खेळणे आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सुरेश पाटील, नागेश वल्याळ, अंबिका पाटील, राजकुमार पाटील, सुनील कामाठी, अमर पुदाले, शशीकला बत्तूल, श्रीकांचना यन्नम, दत्तात्रय गणपा, विक्रम देशमुख, प्रभाकर जामगुंडी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यासह नव्याने निवडूण आलेले नगरसेवक उपस्थित होते़
जनतेच्या भाजपाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत़ त्यामुळे महापालिका निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळाले़ जनतेचा विश्वासघात होणार नाही याची पूर्ण दक्षता घेतील जाईल़ स्मार्ट आणि वैभवशाली सोलापूर होण्यासाठी भाजप नगरसेवकांनी प्रयत्न करावेत़
सुभाष देशमुख, सहकार मंत्री