‘एसटी’च्या बंद तिकीट मशिन्सची कंडक्टर्सकडून वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:49+5:302020-12-05T04:44:49+5:30
सोलापूर : ‘एसटी’च्या तिकीट मशिन्स (ईटीआयएम) बंद पडल्याबद्दल वाहकांना जबाबदार धरून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात त्यांच्याकडून एकूण ५ ...

‘एसटी’च्या बंद तिकीट मशिन्सची कंडक्टर्सकडून वसुली
सोलापूर : ‘एसटी’च्या तिकीट मशिन्स (ईटीआयएम) बंद पडल्याबद्दल वाहकांना जबाबदार धरून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात त्यांच्याकडून एकूण ५ कोटी रुपये वसूल करण्याची मोहीम सुरू केली आहे. सोलापुरातून ३२ लाखांच्या नुकसानभरपाईपोटी आजवर ५२ हजार रुपये वसूल करण्यात आले आहेत.
मशिनची भरपाई कर्मचाऱ्यांनी का द्यावी? अशी भूमिका घेऊन याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. एसटी प्रशासनाने २०१६ मध्ये खासगी कंपनीकडून तिकीट मशिन घेतल्या. त्याचे प्रिंटर काम न करणे, बॅटरी खराब होणे, मशीन हॅँग होणे, की-पॅड नादुरुस्त होणे, असे एक ना अनेक बिघाड झाले आहेत. या कारणाने राज्यातील १५ ते २० हजार मशिन्स बंद पडल्याचे सांगण्यात आले. मशिनची जबाबदारी संबंधित वाहकावर असल्याने संबंधित वाहकाकडून दुरुस्तीसाठी दोन हजार रुपयांपर्यंतची रक्कम वसूल केली जात आहे. रक्कम वसूल न केल्यास आगारप्रमुख आणि स्थानकप्रमुख यांना जबाबदार धरून त्यांच्याकडून वसूल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्याने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
----------------‘एसटी’ प्रशासन खासगी कंपनीशी हितसंबंध जोपासण्यासाठी वसुली करत आहे. राज्यभरातून पाच कोटींपेक्षा जास्त रकमेची वसुली आहे. फक्त सोलापूर विभागातून जवळपास ३२ लाखांची वसुली काढण्यात आली आहे. अशा प्रकारे काढलेला आदेश कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा आहे. हा आदेश प्रशासनाने मागे घ्यावा अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ.
- मुकेश तिगोटे, सरचिटणीस, इंटक