प्रदेशाध्यक्ष आवताडेंच्या फार्म हाऊसवर; आमदार मात्र दिल्लीच्या वाटेवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:23 AM2021-07-27T04:23:54+5:302021-07-27T04:23:54+5:30

मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील फार्म हाऊसवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी रात्री पोहोचले. पाहुणचार झाल्यानंतर ...

At State President Avtade's Farm House; MLAs on the way to Delhi! | प्रदेशाध्यक्ष आवताडेंच्या फार्म हाऊसवर; आमदार मात्र दिल्लीच्या वाटेवर !

प्रदेशाध्यक्ष आवताडेंच्या फार्म हाऊसवर; आमदार मात्र दिल्लीच्या वाटेवर !

Next

मंगळवेढा : आमदार समाधान आवताडे यांच्या मंगळवेढ्यातील फार्म हाऊसवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी रात्री पोहोचले. पाहुणचार झाल्यानंतर चंद्रकांतदादांनी आवताडे यांचा सपत्नीक सत्कार केला. नंतर काही वेळाने आवताडे हे मतदार संघातील रेल्वे आणि रस्त्याच्या प्रश्नांसंबंधी रात्री उशिरा विमानानं दिल्लीला गेले. दादांनी फार्म हाऊसवरच मुक्काम केला.

मंगळवेढा-पंढरपूर मतदार संघात राष्ट्रवादीने मोठी शक्ती पणाला लावली असतानाही भाजपने ही जागा राष्ट्रवादीच्या हातून खेचून घेतली. राज्यभर भाजपने या विजयाचा गाजावाजा केला. पक्षाला चैतन्य देणाऱ्या या विजयानंतर पहिल्यांदाच आ. समाधान आवताडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यासाठी चंद्रकांतदादा आले होते.

रविवारी बार्शी येथील आमदार राजेंद्र राऊत यांच्या मुलाचा लग्नसोहळा उरकून ते पंढरपूरमार्गे मंगळवेढा येथे रात्री पोहोचले. बार्शीपासूनच आमदार प्रशांत परिचारक हे पंढरपूरपर्यंत चंद्रकांतदादांसोबत होते. त्यानंतर अकलूजचे धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्यासोबत दादा मंगळवेढा सूतगिरणीजवळील आवताडेंच्या फार्म हाऊसवर आले. भाजप पदाधिकाऱ्यांसोबत त्यांनी जेवणही केले. यादरम्यान जिल्ह्यातील विविध राजकीय घडामोडी, आगामी निवडणुका याबाबतची मोर्चेबांधणी यावर चर्चा झाली. कोणत्याही परिस्थितीत सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्यासाठी दादांनी कानमंत्रही दिला. त्यानंतर रात्री ११.४५ वाजता आवताडे दिल्लीला जाण्यासाठी निघाले. चंद्रकांतदादांनी मात्र या फार्म हाऊसवरच मुक्काम केला. सोमवारी सकाळी त्यांनी कोल्हापूरकडे प्रयाण केले.

----

मंगळवेढ्यातून रेल्वे नेण्यासाठी

दिल्लीत घेतली मंत्र्यांची भेट !

सोमवारी सकाळी दिल्लीत पोहोचल्यानंतर आ. आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाला मुबलक निधी उपलब्ध करावा, यासाठी केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची भेट घेतली. यावेळी खा. संजय पाटील, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आदी उपस्थित होते. नंतर रेल्वेमंत्री व अवजड वाहतूक मंत्री यांना भेटून विजापूर-मंगळवेढा-पंढरपूर तसेच सांगोला-मंगळवेढा- सोलापूर रेल्वे मार्गासाठी निवेदन केले. मंगळवेढा बाह्यवळण रस्त्यावरील काही नियोजित बोगद्यांबाबतही त्यांनी चर्चा केली. संबंधित मंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचेही आवताडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

---

फोटो :

मंगळवेढा येथे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या सत्काराप्रसंगी आमदार समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते-पाटील, जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, दत्तात्रय जमदाडे, औदुंबर वाडदेकर, गौरीशंकर बुरकुल, गोपाळ भगरे, विजय बुरुकुल, राजेंद्र सुरवसे, शंकर माळी, दीपक माने.

Web Title: At State President Avtade's Farm House; MLAs on the way to Delhi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.