सोलापूर : १० दिवसांचा आनंद द्विगुणित करायला येणाऱ्या बाप्पाच्या आगमनाला केवळ सात दिवस उरले असून, सोलापूरच्या बाजारपेठेतून ९०० कि़मी़ अंतरावरील आंध्र, कर्नाटकमध्ये गणेश मूर्ती निघाले आहेत़ यंदाही परराज्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यातून गणेश मूर्तींना चांगली मागणी असल्याच्या व्यावसायिकांच्या प्रतिक्रिया आहेत़ तसेच पूर्व भागातील गोडावूनमध्ये मोठ्या मूर्तींवर शेवटचा हात फिरवला जात आहे़ सोलापूर शहरातील मूर्तिकार दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करुन काम उरकत आहेत़ यांचे कुटुंब कामात गुंतले आहे़ यंदाही मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातून सांगली, सातारा, कोल्हापूर, कर्नाटमध्ये हुबळी, धारवाड, बेंगलोर आणि आंध्रमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मूर्ती पाठवण्याचे काम रिसेलरमार्फत सुरु आहे़ ------------------------व्हॉटस्अॅपवरुन बुकिंग़़़मोबाईल आणि इंटरनेटचा अधिकाधिक वापर या उत्सवात दिसून येणार आहे़ तत्पूर्वीच आंध्र, कर्नाटक आणि मराठवाड्यातील लहानमोठी गणेश मंडळे मोबाईलच्या साहाय्याने व्हॉटस्अॅपवरुन मूर्तिकाराकडून आवडत्या मूर्तीचे चित्र मागवून त्याच्या किमती फोनवरुनच ठरवल्या जात आहेत़ तसेच मूर्तिकाराच्या बँक खात्यावर आगाऊ रक्कम जमा झाल्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली आहे़ यंदा सर्वच मूर्तिकारांनी व्हॉटस्अॅप आणि मेलचा वापर केला आहे़ त्यामुळे या व्यवसायाला तंत्रज्ञानाची चालना मिळाली आहे़ ------------------------------जय मल्हार ते अष्टभुजा़़़यंदाही सोलापुरात वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती बनवण्याच्या कल्पना मूर्तिकारांमधून पुढे आल्या आहेत़ मागील वर्षी स्व़ बाळासाहेब ठाकरे यांच्या रुपात गणरायांच्या मूर्ती बनवून त्या हैदराबादला पाठवण्यात आल्या होत्या़ सध्या मराठी वाहिनीवर जय मल्हार ही मालिका गाजत आहे़ या मालिकेबाबत टीव्हीवरुन जाहिराती मोठ्या प्रमाणात होत आहेत़ परराज्यातून जय मल्हारच्या मूर्तीला सर्वाधिक मागणी झाली आणि मोजक्याच मूर्ती बनवून त्या पाठवण्यात आल्या आहेत़ यंदाही राधेशी कृष्ण रुपात नृत्य करणारे गणराय, मत्स्य अवतारातील गणराय, साईबाबा, सिंहावर आरुढ झालेले संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, मोरावरुन निघालेले गणराय, ढोलवर नृत्य करणारे बाप्पा अशा अनेक रुपातील बाप्पाच्या मूर्ती साकारल्या आहेत़ ------------------------------मूर्ती बनवण्यासाठी लागणाऱ्या पीओपीच्या किमतीमध्येसुद्धा यंदा ७ टक्के वाढ झाली आहे़ याबरोबरच विविध प्रकारचे रंग, चमकी आणि विजेच्या युनिट दरातही वाढ झाली आहे़ त्यामुळे मूर्तीच्या किमतीत वाढ करणे क्रमप्राप्त ठरले़- अमर कनकी , मूर्तिकार असोसिएशन प्रमुख
सोलापुरी बाप्पा निघाले परराज्यात
By admin | Updated: August 22, 2014 00:45 IST