सोलापूर: सोलापूर विद्यापीठाला सक्षम करण्यासाठी लोकप्रतिनिधींचा रेटा आवश्यक असून प्रतिवर्षी १०० कोटी रूपये दिले तरच इतर विद्यापीठांबरोबर हे विद्यापीठ स्पर्धा करु शकेल असे मत आमदार सतीश चव्हाण यांनी व्यक्त केले़मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाल्याबद्दल रविवारी सायंकाळी बालाजी सरोवर येथे ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे, मनाली ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया ठाकरे यांनी आ. चव्हाण यांचा सत्कार केला़ त्यावेळी आयोजित ‘शिक्षण: वर्तमान, भविष्य आणि वास्तव’ या विषयावरील परिसंवादात ते बोलत होते.मंचावर ज्येष्ठ साहित्यिक गो़मा़ पवार, आ़ दिलीप माने, आ़ दीपक साळुंखे, आ़ प्रणिती शिंदे, माजी आमदार राजन पाटील, सिद्धेश्वर कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी, सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू एऩएऩ मालदार, ‘लोकमत’ चे संपादक राजा माने, पत्रकार दयानंद माने, संजीव पिंपरकर उपस्थित होते़ चर्चासत्रात मंचावरील मान्यवरांसह प्राचार्य शशीकांत हालकुडे, प्राचार्य माळी, प्रा़ राजा ढेपे, संजीव पाटील, अशोक मुलीमनी, श्रीकांत मोरे यांनी भाग घेतला. दिनेश शिंदे यांनी चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले़ प्रारंभी ‘लोकमत’च्या वतीने संपादक राजा माने यांनी चव्हाण यांचा सत्कार केला.