सोलापूर महापालिकेच्या कराची ३२0 कोटी थकबाकी
By Admin | Updated: October 13, 2016 22:09 IST2016-10-13T22:09:37+5:302016-10-13T22:09:37+5:30
कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामांना महापालिकेला पैसे कमी पडत आहेत तर दुसरीकडे मिळकत कराची तब्बल ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले आहे.

सोलापूर महापालिकेच्या कराची ३२0 कोटी थकबाकी
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 13 - कर्मचाऱ्यांचा पगार व विकासकामांना महापालिकेला पैसे कमी पडत आहेत तर दुसरीकडे मिळकत कराची तब्बल ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले आहे.
आयुक्त विजयकुमार काळम यांनी गुरूवारी मिळकत कर वसुलीचा आढावा घेतला. यापूर्वी झालेल्या बैठकीत त्यांनी वसुली क्लार्क व पेठनिहाय असलेल्या थकबाकीची आकडेवारी मागितली होती. गेल्या तीनन दिवसांत सुटीच्या काळात अशा याद्या तयार करण्यात आल्या. २३ विभागांची पेठनिहाय यादी आयुक्तांकडे सादर करण्यात आली. यात शहर, हद्दवाढ व गलिच्छ वस्ती विभागाकडे कराची ३२0 कोटी थकबाकी असल्याचे आढळले. यात २0५ कोटी मागील तर ११४ कोटी चालू थकबाकी आहे. सप्टेंबरअखेर ६५ कोटी ७४ लाख १३ हजार ५३१ इतकी तर ७ आॅक्टोबरअखेर १ कोटी ३४ लाख अशी ६७ कोटी कर वसुली झाली आहे. एकूण थकबाकीच्या केवळ २१.४0 टक्के इतकी वसुली आहे. वसुली कर्मचाऱ्यांच्या कामाबाबत आयुक्तांनी नापसंती व्यक्त केली.
वसुली क्लार्कनी मोकळ्या प्लॉटचे मालक आढळत नसल्याचे सांगितले. त्यावर आयुक्त काळम यांनी प्लॉटच्या मूळ मालकांना थकबाकीच्या नोटिसा काढा, त्यावरही संबंधितांनी दखल न घेतल्यास महसूल कायद्यान्वये संबंधित जागेवर महापालिकेचे नाव लावण्याची कारवाई सुरू करा. प्लॉटधारकांचे नोटरी व्यवहार व इतर तक्रारी ऐकून घेतल्या जाणार नाहीत. रेल्वेची ११ तर अन्य एका संस्थेची ९ कोटी थकबाकी असल्याचे दिसून आले. कोट्यधीश थकबाकीदारांची यादी द्या. त्यासंबंधी मी स्वत: निर्णय घेईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. वसुली आणणाऱ्या क्लार्कनिहाय आयुक्तांनी आढावा घेतला. त्यात शेख, पांढरे, नरोटे, व्ही. व्ही. कुलकर्णी यांची वसुली कमी असल्याचे आढळल्यावर कामात सुधारणा करण्यासाठी त्यांना आठ दिवसांची मुदत देण्यात आली. मोठ्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई करा, असे आदेश आयुक्त काळम यांनी यावेळी दिले.
२0 टक्के वसुलीचे उद्दिष्ट
आठ दिवसांत वसुली विभागाला २0 टक्के वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हद्दवाढ विभागात ११९ कोटींचे उद्दिष्ट आहे, त्यात वसुली फक्त २५ कोटी झाली आहे. उद्दिष्टाच्या केवळ १७.३३ टक्के काम झाले आहे. शहर विभागात १९0 कोटींचे उद्दिष्ट आहे, वसुली फक्त ४१ कोटी झाली आहे. गलिच्छ वस्ती विभागाचे ९ कोटी ९२ लाख उद्दिष्ट आहे तर वसुली फक्त १ कोटी ३३ लाख झाली आहे. या सर्व विभागांनी नवीन उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. दिवाळी तोंडावर आहे. बोनस, उचल व पगारासाठी महापालिकेच्या तिजोरीत पैसा हवा असल्याने वसुलीची मोहीम तीव्र करण्यात आली आहे.