सोलापूर महापालिकेला मिळेना आरोग्य अधिकारी, साथीबाबत संताप नागरिकांत संताप, महापौरांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 11:23 IST2017-11-08T11:21:24+5:302017-11-08T11:23:09+5:30
शहरात पसरलेल्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली आहे.

सोलापूर महापालिकेला मिळेना आरोग्य अधिकारी, साथीबाबत संताप नागरिकांत संताप, महापौरांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि ८ : शहरात पसरलेल्या साथीच्या रोगांचा बंदोबस्त करण्याबाबत मनपाची यंत्रणा कमी पडत असल्याबाबत संताप व्यक्त होत आहे तर दुसरीकडे सक्षम आरोग्य अधिकारी मिळत नसल्याने प्रशासनाची पंचाईत झाली आहे. मंगळवारी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साथीच्या रोगांकडे लक्ष वेधून तातडीने आरोग्य अधिकारी उपलब्ध करण्याची मागणी केली आहे.
शहरात फैलावलेल्या स्वाईन फ्लू, मलेरिया, चिकुनगुन्या व डेंग्यूच्या साथीबाबत नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. डेंग्यू संशयित आजाराने बळी गेलेल्याची माहिती देऊनही आरोग्य विभाग ही बाब गांभीर्याने घेण्यास तयार नाही. डेंग्यू व स्वाईन फ्लूसारख्या आजारांचा प्रतिबंध करण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. करणराज पोळ (वय ८, रा. क्रांतीनगर, निराळेवस्ती) येथील बालकांचा डेंग्यूने मृत्यू झाला. असे असताना एनआयव्हीकडून अहवाल आल्याशिवाय डेंग्यूने मृत्यू झाला असे म्हणता येणार नाही, असा पवित्रा आरोग्य विभागाने घेतला आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यू उपचार महागडे आहेत. मनपाने उपचाराची व्यवस्था करावी अशी आमदार शिंदे यांनी मागणी केली आहे. काँग्रेस महिला शहर अध्यक्षा हेमा चिंचोळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत आयुक्त डॉ. ढाकणे यांना निवेदन दिले. याप्रसंगी माजी महापौर नलिनी चंदेले, सुमन जाधव, प्रमिला तुपलवंडे, रेणुका मंजुळकर, लता गुंडला आदी उपस्थित होते.
प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. जयंती आडके यांच्या कारभाराला वैतागून सभेने त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव मंजूर केला आहे. पण हा पदभार घेण्यास कोणी तयार नाही. आयुक्त डॉ. ढाकणे यांनी सार्वजनिक आरोग्य विभागातील एका डॉक्टरास खास विनंती करून सोलापूरला आणण्याची तयारी केली होती. आरोग्य सचिवांना बोलून त्यांनी बदलीची फाईल हलविली. आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्याकडे ही फाईल गेल्यावर त्या डॉक्टराची दुसरीकडे बदली करण्यात आली. त्यानंतर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना दुसरे नाव सुचविण्याबाबत कळविण्यात आले. दोन महिने प्रयत्न करून असा खेळ झाल्याने आयुक्त डॉ. ढाकणे नाराज झाले तर इकडे आरोग्य विभागाची वाट लागली आहे. आरोग्य अधिकाºयाला असलेला कमी पगार, जादा जबाबदारी यामुळे कोणाची तयारी होत नसल्याचे दिसून येत आहे.
-----------------------
आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी केले लक्ष्य
आरोग्याच्या प्रश्नावर विरोधकांनी लक्ष्य केल्याने महापौर शोभा बनशेट्टी यांनी तडक मुंबईला धाव घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्याची आणीबाणी लक्षात घेऊन तातडीने सक्षम आरोग्य अधिकाºयाची नियुक्ती करावी, अशी मागणी केली आहे. तसेच दुहेरी जलवाहिनीसाठी जादा ३५0 कोटीचा निधी, एनटीपीसीची योजना मार्गी लावण्यासाठी सार्वजनिक आरोग्य अभियंता पदावर जीवन प्राधिकरणाकडील अभियंत्याची नियुक्ती, भाडेकराराने गाळ्यांचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली आहे. या मागण्यांचे निवेदन देताना शिक्षण मंडळाचे माजी सदस्य दत्तात्रय गणपा, श्रीशैल बनशेट्टी आदी उपस्थित होते.