सोलापूर मान्सुन अपडेट : लांबलेल्या पावसाने वाढवली चिंता
By Appasaheb.dilip.patil | Updated: August 1, 2017 17:59 IST2017-08-01T17:57:29+5:302017-08-01T17:59:00+5:30

सोलापूर मान्सुन अपडेट : लांबलेल्या पावसाने वाढवली चिंता
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १ : जिल्ह्यातील ९२ मंडलांपैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असून, त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षाही अतिशय कमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. खरिपाचे क्षेत्र असलेल्या उत्तर-दक्षिण, अक्कलकोट, मंगळवेढा, मोहोळ या तालुक्यांतच कमी पावसाची नोंद झाली असली तरी गेला दीड महिना पाऊस लांबल्याने संपूर्ण पिके धोक्यात आली आहेत.
सोलापूर जिल्ह्यात रोहिणी व मृग या नक्षत्रांत शक्यतो पाऊस पडत नाही. काही भागात दमदार पाऊस पडल्याने ओढे, नालेही वाहिले होते. यामुळे यावर्षी पाऊसकाळ चांगला असल्याने शेतकºयांनी धाडसाने शेतात ऊस लागवड करण्यास सुरुवात केली. याशिवाय बागायती पिकेही घेण्यास सुरुवात केली. गडबड करून खरीप पेरणीही उरकली. मात्र खरीप पेरणीनंतर पाऊस गायबच झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात चार जून ते १६ जून या कालावधीत चांगला पाऊस पडला. त्यानंतर पाऊस पडला नसल्याने संपूर्ण खरीप पिके वाया जाऊ लागली आहेत़ त्यातच पिकांवर यंदा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आहे.
रोहिणी व मृग या नक्षत्रांमध्ये पडलेला पाऊसही जिल्ह्यातील ९२ पैकी ५५ मंडलांमध्ये सरासरीपेक्षा कमी पडला आहे. तर त्यापैकीच १४ मंडलांमध्ये १०० मि.मी. पेक्षा कमी पाऊस पडला आहे. बोरामणी मंडलात ६३ मि.मी., अक्कलकोट तालुक्यातील जेऊर मंडलात ३० मि.मी., तडवळ मंडलात ८७ मि.मी., करजगी मंडलात ५८ मि.मी., मोहोळ तालुक्यातील वाघोली मंडलात ९५ मि.मी., कामती (बु.) मंडलात ४८ मि.मी., करमाळ्यातील कोर्टी मंडलात ३८ मि.मी., पंढरपूरच्या भाळवणी मंडलात ९३ मि.मी., सांगोल्यातील जवळा मंडलात ३२ मि.मी., माळशिरसच्या लवंग मंडलात ४२ मि.मी., पिलीव मंडलात ८६ मि.मी., मंगळवेढा तालुक्यातील मरवडे मंडलात ७४ मि.मी., हुलजंती मंडलात ५३ मि.मी. व भोसे मंडलात ४९ मि.मी. पाऊस पडला आहे.
उत्तर तालुक्यातील सर्वच पाचही मंडलांत, दक्षिणमधील वळसंग, मुस्ती, मंद्रुप, होटगी, विंचूर, निंबर्गी, बार्शी तालुक्यातील आगळगाव, पांगरी, सुर्डी, अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, चपळगाव, मैंदर्गी, किणी, मोहोळ तालुक्यातील शेटफळ, सावळेश्वर, नरखेड, पेनूर, टाकळी सिकंदर, माढ्यातील रांझणी, म्हैसगाव, करमाळ्यातील केत्तूर, उमरड, अर्जुननगर, पंढरपूर तालुक्यातील सर्वच नऊ मंडलांत कमी पाऊस झाला आहे. सांगोल्यातील कोळा, महुद बु., शिवणे, माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर, नातेपुते, दहिवली, मंगळवेढ्यातील आंधळगाव, मारापूर या मंडलांत कमी पावसाची नोंद झाली.
--------------
३१ जुलैपर्यंत अपेक्षित पाऊस
उत्तर सोलापूर-२३९.६० मि.मी., दक्षिण सोलापूर- २३९.६० मि.मी., बार्शी-२३६.९० मि.मी., अक्कलकोट- २५४.६० मि.मी., मोहोळ-२०३.१० मि.मी., माढा-१८३.३० मि.मी., करमाळा-२०३.९० मि.मी., पंढरपूर-१८४.४० मि.मी., सांगोला-१६०.५० मि.मी., माळशिरस-१५१.४० मि.मी., मंगळवेढा-१७६.६० मि.मी. एकूण २२३३.९० मि.मी. तर सरासरी २०३.०८ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित आहे. प्रत्यक्षात एकूण १८६६.२६ मि.मी. तर सरासरी १६९.६६ मि.मी. इतका पाऊस पडला आहे.