सोलापूर मुद्रा बँक : जिल्ह्यात दीडशे कोटीवर कर्ज वितरण
By Admin | Updated: March 8, 2017 19:07 IST2017-03-08T19:07:14+5:302017-03-08T19:07:14+5:30
नवउद्योजक घडावेत यासाठी सुरु करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेतून डिसेंबर २०१६ अखेर सोलापूर जिल्ह्यात १६ हजार ३३०

सोलापूर मुद्रा बँक : जिल्ह्यात दीडशे कोटीवर कर्ज वितरण
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 8 - नवउद्योजक घडावेत यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुद्रा बँक योजनेतून डिसेंबर २०१६ अखेर सोलापूर जिल्ह्यात १६ हजार ३३० प्रकरणे मंजूर करण्यात आली असून, १५० कोटी ८६ लाख ३४ हजाराचे कर्ज वितरण करण्यात आल्याची माहिती जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक सुरेश श्रीराम यांनी दिली.
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा योजना सुरु केली असून, सोलापूर जिल्ह्यात या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या योजनेची शिशु, किशोर आणि तरुण या तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. शिशु योजनेत ५० हजारापर्यंत किशोर योजनेत ५० हजार ते पाच लाखापर्यंत आणि तरुण योजनेत पाच लाख ते दहा लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे.
जिल्ह्यात मंजूर झालेल्या प्रकरणामध्ये शिशु गटाच्या १२ हजार ५६० प्रकरणासाठी ३८ कोटी १८ लाख ५० हजार,किशोर गटाच्या तीन हजार ३५२ प्रकरणासाठी ८५ कोटी ८९ लाख २० हजार आणि तरुण गटाच्या ४१८ प्रकरणास २६ कोटी ७८ लाख ६५ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती श्रीराम यांनी दिली. या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यवसायाचा परवाना, शॉप्क्ट परवाना, जागा भाड्याची असल्याचे भाडे करारापत्र, आधार कार्ड, पॅनकार्ड, मोठ्या कजार्साठी खर्च - ताळेबंद, प्रोजक्ट रिपोर्ट महत्वाची कागदपत्रे कागदपत्रे आवश्यक आहे. कर्जास जामीनदाराची आवश्यकता नसून या योजनेचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीराम यांनी केले आहे.