सोलापूर इलेक्शन : पं़ स़ मध्ये आवताडे गटाचे वर्चस्व
By Admin | Updated: February 24, 2017 18:47 IST2017-02-24T18:47:09+5:302017-02-24T18:47:09+5:30
मंगळवेढा तालुका : ढोबळे यांच्या पत्नीचा पराभव

सोलापूर इलेक्शन : पं़ स़ मध्ये आवताडे गटाचे वर्चस्व
सोलापूर इलेक्शन : पं़ स़ मध्ये आवताडे गटाचे वर्चस्व
विलास मासाळ - आॅनलाईन लोकमत मंगळवेढा
जि़ प़ च्या ४ पैकी ३ जागा आणि पं़ स़च्या ८ पैकी ५ जागा संत दामाजी कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे यांच्या जनहित विकास आघाडीला मिळाल्या आहेत. त्यामुळे पंचायत समितीवर जनहित विकास आघाडीने वर्चस्व मिळवले असून याच गटाचा सभापती होणार आहे. तसेच आ. भारत भालके गटाला जि़ प़ ची १ व पं़ स़ च्या ३ जागा मिळाल्या आहेत. आ. प्रशांत परिचारक गटाला एकही जागा मिळाली नाही. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या पत्नीचा पराभव झाल्यामुळे ढोबळे यांना मोठा धक्का मानला आहे.
तालुक्यामध्ये माजी मंत्री ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा ढोबळे यांचा शीला सचिन शिवशरण यांनी पराभव केल्यामुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. अगोदरच राजकीयदृष्ट्या अडचणीत सापडलेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांचे आता आणखी मोठी गोची झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे एकेकाळी संपूर्ण तालुक्यात जि. प व पं. स़ निम्म्यापेक्षा जास्त सदस्य हे राष्ट्रवादीचे होते़; मात्र या निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आला नाही. आ. भारत भालके गटाला या निवडणुकीत मोठा धक्का बसला असून संत दामाजी साखर कारखाना पाठोपाठ पंचायत समितीची सत्ता ही सोडावी लागली आहे. तसेच भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.
आज सकाळी शासकीय गोदामामध्ये मतमोजणीला सुरुवात झाली एकाचवेळी चार गट व आठ गण अशी मतमोजणी सुरु झाली होेती. सुरूवातीलाच हुलजंती गटातील शीला शिवशरण व मरवडे गणातील प्रदीप खांडेकर यांना भालेवाडी, मरवडे गावातून मताधिक्य मिळाल्याचे वृत्त पसरताच तालुका खरेदी-विक्री संघ, आवताडे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी शिट्टी वाजवून आनंद व्यक्त केला. हा आनंद शेवटपर्यंत कायम राहिला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप शेलार, आशिष लोकरे, यांच्या मार्गदर्शनाने निवडणूक निकालाची प्रक्रिया सुरळीत पार पडली़ यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोनि रवींद्र शेळके, सपोनि नामदेव शिंदे, अभिषेक डाके यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.
---------------------------
हुलजंती जि़ प़ गटातून कोणतीही तयारी नसताना निवडणुकीला सामोरे जावे लागले. कार्यकर्ते काम करण्यास कमी पडले व कार्यकर्त्यामध्ये समन्वयाचा अभाव दिसला नाही. अचानक निवडणुकीला सामोरे गेल्यामुळे हा पराभव पत्करावा लागला. निवडणूक बिनविरोध होईल असे वाटत असताना विश्वासाने व ठरल्याप्रमाणे ठरवून धोका दिला, परंतु यामध्ये कोणाला दोषी धरून चालणार नाही़ यापुढे जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवून ते प्रश्न सोडविण्यासाठी हा पराभव विसरून काम करणार आहे़
- प्रा़ लक्ष्मणराव ढोबळे,
माजी पालकमंत्री