सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’
By Admin | Updated: February 24, 2017 18:33 IST2017-02-24T18:33:36+5:302017-02-24T18:33:36+5:30
सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’

सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’
सोलापूर इलेक्शन : माढ्यात विरोधक ‘नापास’
इरफान शेख - आॅनलाइन लोकमत कुर्डूवाडी
माढा तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सर्वच्या सर्व उमेदवार राष्ट्रवादीचेच विजयी झाले असून २५ वर्षांपासून निघालेला आ. बबनराव शिंदे व संजय शिंदे यांच्या विकासाचा अश्वमेध आजपर्यंत रोखण्यात विरोधकांना अपयश आले. यामुळे ते यंदाही फेल झाल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले.
आ. शिंदे यांनी तालुक्यात कोणालाही, कुठेही उभे करू द्या, जनता त्यांच्यावर विश्वास टाकून निवडूनच देतात. शिंदे कुटुंबीयांनी तर तालुक्यातील सर्वच ठिकाणी आपला झेंडा अटकेपार लावला आहे. यात आ. बबनराव शिंदे यांचे ज्येष्ठ पुत्र रणजितसिंह शिंदे हे मानेगाव गटातून, विक्रमसिंह शिंदे हे बेंबळे गणातून, पुतणे धनराज शिंदे हे लऊळ गणातून तर बंधू संजय शिंदे हे कुर्डू गटातून उभे राहून निवडून आले. पंचायत समिती निवडणुकीत लऊळ गणातील धनराज शिंदे हे ६ हजार ४९ मताधिक्याने तर जिल्हा परिषदेसाठी कुर्डू गटातील संजय शिंदे हे ८ हजार ८५९ मताधिक्याने निवडून आले आहेत. या दोन्ही चुलत्या, पुतण्यांचे मताधिक्य सर्वाधिक आहे. जिल्हा परिषदेचे सर्वच उमेदवार दीड हजारापेक्षा जास्त मताधिक्याने विजयी झाले आहेत तर पंचायतीचे १४ पैकी ११ उमेदवार दीड हजारापेक्षा अधिक मताधिक्याने विजयी झाले आहेत.
माढा तालुक्यात जि. प. च्या सात व पंचायत समितीच्या १४ जागा आहेत. आ. शिंदे व संजय शिंदे या बंधूंविरोधात सर्वच पक्ष एकत्र येऊन निवडणूक लढवित होते, तर शिवसेनेनेही इतर पक्षांशी छुपी आघाडी केली होती. मात्र त्यांचे सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले आहेत. गत निवडणुकीत पंचायत समितीच्या चार जागा शिंदे गटाच्या विरोधकांकडे होत्या. त्या जागाही हिसकावून घेण्यात शिंदे बंधू यशस्वी ठरले आहेत. मानेगाव व मोडनिंब येथील लढत सर्वात जास्त चर्चेत होती. ऐनवेळी पं. स. चे माजी सभापती रणजितसिंह शिंदे यांना मोडनिंब गटातून मानेगाव गटात राष्ट्रवादी पुरस्कृत होऊन जावे लागले. तेथे त्यांची लढत शिवसेनेचे शिवाजी सावंत यांचे पुत्र पृथ्वीराज सावंत व माजी आ. धनाजीराव साठे यांचे पुत्र दादासाहेब साठे यांच्याशी झाली. यात ते विजयी झाले.
मोडनिंब गटात गेल्या चार वेळेस जि. प. वर निवडून आलेले जि. प. चे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांनी ऐनवेळी आपला अपक्ष अर्ज भरून राष्ट्रवादीच्या भारत शिंदे यांना कडवी लढत दिली. मात्र त्यात त्यांचा १,६५५ मतांनी पराभव झाला. या मतदारसंघात सोशल मीडियावर प्रचार अधिक प्रमाणावर झाला, जातीय समीकरणे मांडण्यात आली. मात्र राष्ट्रवादी यातही विजयीच ठरली.
--------------------------
निमगाव हीच राजधानी
निमगाव टें. हे गाव माढा तालुक्यातील कपाळाला कोंदले गेले असून शिंदे कुटुंबातील एकाच छत्राखाली राष्ट्रवादीचे आ. बबनराव शिंदे, दोन जिल्हा परिषद सदस्य त्यापैकी अपक्ष संजय शिंदे, दुसरे राष्ट्रवादी पुरस्कृत रणजितसिंह शिंदे व राष्ट्रवादीचे दोन तालुका पंचायत सदस्य आहेत. काही दिवसातच आमदारांसह जिल्हा परिषद अध्यक्ष व पंचायत समितीचे सभापती यांचेही वास्तव्य होईल, अशी चर्चा आहे.
-------------------------------
संजय शिंदे सर्वाधिक मतांनी विजयी
तालुक्यात जिल्हा परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत कुर्डू जिल्हा परिषद गटामध्ये स्वाभिमानीचे संजय विठ्ठलराव शिंदे यांना १५,१७४ तर शिवसेनेचे भारत पाटील यांना ६,३१५ मते पडली आहेत. ८, ८५९ मतांनी स्वाभिमानीचे संजय विठ्ठलराव शिंदे सर्वाधिक मतांनी विजयी झाले आहेत टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या अंजनादेवी शिवाजी पाटील यांना १०,७८७ तर शिवसेनेच्या सुनीता संजय पाटील ९,३२७ मते पडली आहेत. राष्ट्रवादीच्या अंजनादेवी पाटील या १,४६० म्हणजे सर्वात कमी मतांनी विजयी झाल्या आहेत.