सोलापूरातील एसीबीच्या कारवाईत सा. बां. विभागाचे दोन लिपिक अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 13:11 IST2017-11-02T13:11:26+5:302017-11-02T13:11:38+5:30
पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

सोलापूरातील एसीबीच्या कारवाईत सा. बां. विभागाचे दोन लिपिक अडकले
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि २ : पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाºया येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील दोन लिपिकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सातरस्ता येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणातील तक्रारदार यांचे वडील सार्वजनिक बांधकाम विभागामधून निवृत्त होऊन मयत झाले आहेत. त्यांची पेन्शन तक्रारदाराच्या आईस मंजूर होती. या पेन्शनची सुधारित आश्वासितप्रमाणे आकारणी करण्याचा प्रस्ताव महालेखाकार कार्यालय, मुंबई यांच्याकडे पाठवण्यासाठी तक्रारदाराच्या आईने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अर्ज केला होता. यासंदर्भात चौकशीसाठी तक्रारदार गेला असता त्याच्याकडे वरिष्ठ लिपिक राजेंद्र तिपण्णा जमादार व कनिष्ठ लिपिक सुजाता गायकवाड यांनी २ हजार रुपयांची लाच मागितली. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती.
लाचलुचपत विभागाने तक्रारीची दखल घेऊन खात्री केली असता त्यात तथ्य असल्याचे आढळले. त्यावरुन आज (बुधवारी) सायंकाळी ५.३० वाजता सात रस्ता येथील सा. बां. विभागाच्या कार्यालय परिसरात सापळा रचण्यात आला. त्यात तक्रारदाराकडून २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना कनिष्ठ लिपिक गायकवाड यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणात वरिष्ठ लिपिक जमादार यासही ताब्यात घेतले आहे. दोघांविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त संदीप दिवाण, दिलीप बोरस्ते अप्पर पोलीस उपायुक्त पुणे, सहा. पोलीस आयुक्त अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.