सीना-माढा उपसाचा वीज पुरवठा होणार नाही खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:20 IST2021-03-24T04:20:29+5:302021-03-24T04:20:29+5:30
माढा तालुक्यातील ४० हजार एकर क्षेत्राचे नंदनवन करणारी सीना माढा उपसा जलसिंचन योजना २००४ मध्ये कार्यान्वित झाली आहे. ...

सीना-माढा उपसाचा वीज पुरवठा होणार नाही खंडित
माढा तालुक्यातील ४० हजार एकर क्षेत्राचे नंदनवन करणारी सीना माढा उपसा जलसिंचन योजना २००४ मध्ये कार्यान्वित झाली आहे. सध्या उन्हाळा हंगाम असल्याने तालुक्यात या योजनेच्या सिंचन क्षेत्रातील उभ्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून बिल वसुलीसाठी वीज कनेक्शन तोडण्याविषयी मोहीम हाती घेतली आहे.
शेतातील उभी पिके धोक्यात येतील ही बाब लक्षात घेत शेतकरी वर्गाला दिलासा मिळावा म्हणून सीना माढा उपसा सिंचन योजनेचे थकीत वीज बिल १ कोटी ६२ लाख रुपये भरण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार कृष्णा खोरे विकास महामंडळाने ही रक्कम मंजूर करून महाविरण कंपनीला दिल्यामुळे योजना सुरळीतपणे सुरू राहणार आहे.
तालुक्यातील उभ्या पिकांचा, पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
थकीत वीज बिल भरल्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.