Solapur Crime: 'दारूच्या नादात सोन्याचा बदाम का आणला?' या कारणावरून बापलेकात भांडण झाले. याचे पर्यवसान पित्याने डोक्यात दगड घालून खून करण्यात झाले. सोमनाथ किरण ठाकरे (वय २८, रा. कोरफळे, ता. बार्शी) असे मरण पावलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना सोमवार, ३ मार्च रोजी रात्री ७ वाजेच्या दरम्यान गावाजवळच शेतात वडील राहतात त्या वस्तीवर घडली. याबाबत मयताची पत्नी स्वाती सोमनाथ ठाकरे (वय १९, रा. कोरफळे) हिने तालुका पोलिसात फिर्याद दिली असून सासरे किरण गोविंद ठाकरे (वय ६५) यांच्याविरुद्ध बी. एन. एस. १०३ : १ : प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेनंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे. याची माहिती मिळताच तालुका पोलिस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील पिता हा कोरफळे गावापासून दोन किलोमीटर अंतरावर शेतातील वस्तीवर राहत असून मयत मुलगा व पत्नी गावात असलेल्या घरी राहत होते. बापलेकांना दारूची सवय असल्याने दारू पिण्याच्या कारणावरून त्यांच्यात नेहमीच भांडणे होत होती. त्या दिवशी मयताने मुलाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम मोडून गाडीचा हप्ता भरावयाचा आहे तो दे म्हणाला. यावर पत्नीने तो बदाम सासऱ्याजवळ दिल्याचे सांगताच मयत मुलगा वस्तीवर पित्याकडे गेला.
मुलाचा सोन्याचा बदाम तुम्ही का आणला? असे विचारताच बापानेच मुलाच्या डोक्यात दगड फेकून मारला. तो खाली पडताच पुन्हा मोठा दगड उचलून त्याच्या डोक्यात घालून जीवे ठार मारल्याची घटना घडली. पोलिसानी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक भालेराव करत आहेत.