Solapur Crime: बेकायदा घुसखोरी केलेल्या १२ बांगलादेशींकडे भारताचे बनावट आधार कार्ड, त्याच्यासोबतच बांगलादेशी जन्म दाखल्याची कागदपत्रेही आढळून आली. आठ महिन्यांपूर्वी एक बांगलादेशी सोलापुरात आला, त्यानंतर एकापाठोपाठ एक दाखल झाले. पाच जण १५ दिवसांपूर्वी आल्याने त्यांची संख्या वाढली, बांगलादेशी घुसखोरी करून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सर्व जण काम करीत असलेल्या कारखान्याच्या पाठीमागील हॉलमध्ये राहत होते.
आर.टी. चौक एमआयडीसी येथील अंध व अपंगांसाठी कार्यरत असलेल्या सहकारी औद्योगिक संस्थेत काही कामगार बांगलादेशी असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. माहितीवरून पोलिसांनी बुधवारी रात्री ०८.३० वाजता श्री जगदंबा रेडिमेड ड्रेसेस, सहकारी औद्योगिक संस्थेत जाऊन चौकशी केली.
पोलिसांनी सर्वांची चौकशी केली, त्यांच्याकडे कागदपत्रांची मागणी केली. तेव्हा त्यांच्याकडे बांगलादेशी जन्म दाखल्यांच्या प्रती, बनावट आधार कार्ड व इतर कागदपत्रे मिळून आली. भारतामध्ये येताना लागणारी कोणतीही वैध प्रवासी परवानगी, सीमेवरील मुलकी (नोंदणी) अधिकाऱ्याच्या लेखी परवानगीशिवाय अवैध मार्गाने घुसखोरी करून भारतात प्रवेश केला. बनावट आधार कार्ड बनवून ते राहत होते, असे पोलिसांच्या लक्षात आले.