शिवसेनेचीही होणार ऊस परिषद ?
By Admin | Updated: October 27, 2014 23:44 IST2014-10-27T21:28:32+5:302014-10-27T23:44:18+5:30
शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी

शिवसेनेचीही होणार ऊस परिषद ?
गणपती कोळी - कुरुंदवाड -विधानसभा निवडणूक तिकीट वाटपावरून ‘स्वाभिमानी’त फूट पडून खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी धनुष्यबाण हाती घेतले व त्यामध्ये यशस्वीही झाले. ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व शिवसेनेला मिळाल्याने शिवसेनेमध्ये उल्हासमय वातावरण निर्माण झाले आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करून दाखविण्यासाठी आम. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीही ऊस परिषद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदापासून तालुक्यात दोन ऊस परिषद होण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हा प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी म्हणून ओळखला जातो. ऊस उत्पादनाचा खर्च व साखर कारखान्याकडून मिळणारा दर यामध्ये तफावत राहत नसल्याने शेतकरी चळवळीतून खा. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना उदयास आली. ऊस उत्पादनासाठी येणारा एकरी खर्च तसेच एका टनापासून साखर कारखान्यांना मिळणारे साखर व उपपदार्थ यांच्या हिशेबाचा ताळमेळ सांगून शेतकऱ्यांमध्ये चळवळीच्या माध्यमातून खा. शेट्टी यांनी जागृती केली अन् योग्यवेळी आंदोलन केले. बऱ्याचअंशी आंदोलनाला यश आल्याने शेतकऱ्यांचा स्वाभिमानीबरोबर विश्वास अधिक दृढ झाला. त्यातूनच खा. शेट्टी यांना शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून प्रत्येकवेळी निवडणुकीतही यश येत गेले.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर खा. शेट्टी यांचा आदरयुक्त दबाव असल्याने ऊस परिषद झाल्याशिवाय कोणताही शेतकरी उसाला तोड घेत नाही. त्यामुळे या ऊस परिषदेकडे शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदार, प्रशासनाचे लक्ष लागून राहत असे. यंदा ऊस हंगाम प्रारंभीच विधानसभेची निवडणूक झाली. मात्र, ‘स्वाभिमानी’च्या शिरोळ विधानसभेच्या तिकीट वाटपावरून खा. शेट्टी यांचे खंदे फलंदाज उल्हास पाटील यांनी स्वाभिमानीला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेची त्यांनी उमेदवारी घेऊन यशही प्राप्त केले. या निवडणुकीत स्वाभिमानीत फूट पडल्याने तसेच खा. शेट्टी यांच्यावर जातीयवादाचा आरोप केल्याने खा. शेट्टी नाराज होते. तसेच निवडणुकीत पाटील यशस्वी झाल्याने स्वाभिमानीवरच आत्मचिंतन करण्याची वेळ आली.
शेतकऱ्यांवरील पे्रम दाखविण्यासाठी प्रत्येक वर्षी शिवसेना स्वतंत्ररीत्या ऊस आंदोलन करीत असे. मात्र, यंदा जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढल्याने तसेच आ. पाटील यांच्या रूपाने ऊस आंदोलन चळवळीतील भक्कम व अनुभवी नेतृत्व मिळाल्याने शिवसेनेचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. शेतकऱ्यांशी नाळ टिकविण्यासाठी तसेच आपले कर्तृत्व व नेतृत्व सिद्ध करण्यासाठी आ. पाटील शिरोळ येथे शिवसेनेची
ऊस परिषद घेण्याच्या तयारीत आहेत. असे झाले तर यंदापासून तालुक्यातून दोन ऊस परिषद गाजण्याची शक्यता आहे.