टोलमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना मेसेज--येथे पाठवा एस.एम.एस.
By Admin | Updated: November 26, 2014 00:23 IST2014-11-26T00:11:15+5:302014-11-26T00:23:59+5:30
रविवार पेठेचा निर्धार : एक लाख एस.एम.एस.पाठविणार

टोलमुक्तीसाठी मुख्यमंत्र्यांना मेसेज--येथे पाठवा एस.एम.एस.
कोल्हापूर : कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना एक लाख एस.एम.एस. पाठविण्याचा निर्धार आज, मंगळवारी संयुक्त रविवार पेठेच्यावतीने करण्यात आला. ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो’ या फलकाचे अनावरण बिंदू चौक येथे करून या मोहिमेला पेठेच्यावतीने प्रारंभ केला.
कोल्हापूरला टोलमुक्त करण्यासाठी अनेक बैठका झाल्या, उपोषणे झाली, रास्ता रोको झाले. प्रसंगी टोलनाकेसुद्धा पेटविले गेले, तरीसुद्धा कोल्हापूरचा टोल सुरूच असल्याने त्याबाबतच्या जनभावना थेट नूतन मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी रविवार पेठेच्यावतीने हा उपक्रम हाती घेतला आहे. ‘आपला एक एस.एम.एस. कोल्हापूर टोलमुक्त करू शकतो’ असे भावनिक अहवान करणारे फलक रविवार पेठेच्यावतीने आज बिंदू चौकात लावण्यात आले.
या उपक्रमाबाबत बोलताना महेश ढवळे म्हणाले, कोल्हापूरचा टोल हटविल्याशिवाय कोल्हापूरची जनता शांत बसणार नाही. टोलविरोधी आंदोलनाचा हासुद्धा एक टप्पा असून, यासाठी आम्ही यावेळी सोशल मीडियाचा वापर करीत आहोत. शहरातील विविध व्हॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही या उपक्रमाबाबत जनजागृती करणार आहोत. एक लाख एस.एम.एस. तरी आम्ही मुख्यमंत्र्यांना पाठविणार आहोत.
याप्रसंगी विनायक चंदुगडे, आप्पा लाड, बाळासाहेब मुधोळकर, रवी पाटील, अशोक भोसले, उदय पाटील, संजय तोरस्कर, अमोल मोरे, गजानन तोडकर, आदी उपस्थित होते.
येथे पाठवा एस.एम.एस.
कोल्हापूरच्या टोलबाबत तुमच्या भावना ०९७३०४७५७१३ व ०९३७३१०७८८१ या मुख्यमंत्र्यांच्या मोबाईलवर एस. एम. एम. पाठवून कळवा, असे आवाहन संयुक्त रविवार पेठेच्यावतीने यावेळी करण्यात आले.