प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसच्या फेऱ्या वाढविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:44 IST2020-12-05T04:44:35+5:302020-12-05T04:44:35+5:30
सांगोला : लॉकडाऊन काळात बंद असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. सध्या प्रवासी संख्येनुसार ...

प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसच्या फेऱ्या वाढविणार
सांगोला : लॉकडाऊन काळात बंद असलेली लालपरी पुन्हा रस्त्यावर धावू लागली आहे. सध्या प्रवासी संख्येनुसार ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. ज्या गावांसाठी फेऱ्या वाढवण्याची आवश्यकता आहे अशा गावातील प्रवासी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे लेखी मागणी करावी. तेथील प्रवाशांचा प्रतिसाद पाहता बसच्या फेऱ्या वाढविल्या जातील अशी माहिती आगारप्रमुख पांडुरंग शिकारे यांनी दिली.
लॉकडाऊन काळात एसटीची बससेवा बंद ठेवली होती. शासन निर्देशानुसार बसमध्ये प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करून एका सीटवर एकच प्रवासी या नियमानुसार वाहतूक सेवा सुरू केली आहे. दरम्यान, सांगोला तालुक्यातील सर्व व्यवहार पूर्ववत झाल्याने ग्रामीण भागातील प्रवाशांनी एसटीच्या फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे.
सांगोला आगाराकडून मागणी व प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बसच्या फेऱ्या सुरू केल्या आहेत. एसटीच्या एका फेरीसाठी बसमध्ये किमान २० प्रवासी अपेक्षित आहेत. सध्या शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थी अभावी ५० टक्के प्रवासी संख्या घटली आहे. आगारातील ४२ बसमधून प्रतिदिन १५० फेऱ्या केल्या जातात. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांनी फेऱ्या वाढविण्याची गरज असल्यास त्या गावातील प्रवासी नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे एसटीच्या फेऱ्या वाढविण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे मागणी करावी. प्रवाशांची संख्या विचारात घेऊन फेऱ्या वाढविल्या जातील असे आगार व्यवस्थापक पांडुरंग शिकारे यांनी सांगितले.