सरपंच निवडीची तारीख अनिश्चित, गोव्याला गेलेले सदस्य परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:21 IST2021-02-13T04:21:59+5:302021-02-13T04:21:59+5:30
निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर निवडीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची प्रचंड उत्सुकता गावोगावी लागलेली होती. प्रशासनाने येथील सरपंच निवडीचा कार्यक्रम ...

सरपंच निवडीची तारीख अनिश्चित, गोव्याला गेलेले सदस्य परतले
निवडणुकीनंतर सरपंच पदाच्या आरक्षणाच्या सोडतीनंतर निवडीच्या कार्यक्रमाच्या घोषणेची प्रचंड उत्सुकता गावोगावी लागलेली होती. प्रशासनाने येथील सरपंच निवडीचा कार्यक्रम ९, १२ व १३ फेब्रुवारी या तीन टप्या टप्याने जाहीर केल, परंतु काही गावचे सरपंच पदाचे आरक्षण चुकले म्हणून तक्रारी झाल्या आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व निवडी स्थगित केल्याने अनेकांची गोची झाली. काही गावात सत्ताधारी गटाला काटावरचे बहुमत आहे, तर काही गावांत सत्ता प्रस्थापित होऊनही विरोधकांचा सरपंच होणार आहे. काहींनी गावपातळीवरील अनेक गट एकत्र करून गावची निवडणूक लढविली होती. आता गावच्या सरपंच निवडीलाच उशिर होत असल्याने यामध्ये विस्कळीतपणा निर्माण झाला आहे. आपला कारभारी कोण होणार आणि त्याला किती दिवस लागणार आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बेंबळे, उपळाईची न्यायालयीन लढाई
बेंबळेच्या निवडणुकी वार्ड क्र ३ व ४ ची प्रकिया ही बेकायदेशीर झाल्याची तक्रार माढा न्यायालयात दाखल झाली आहे. त्याची न्यायालयीन लढाई सुरु आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडेही तक्रार दाखल आहे. तसेच उपळाई (बु) गावची ही निवडणुकीबाबत तक्रार दाखल झालेली आहे. येथे प्रभाग २ मधील बुथ क्र १ मधील निवडणुकीला उभा राहिलेल्या दादासाहेब नागटिळक गटाच्या पोपट लहू भांगे, मनीषा भारत वाकडे, आशा गणेश शितोळे या तिन्ही उमेदवारांनी मतदान यंत्रावर आक्षेप घेत माढा न्यायालय व जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत. त्याबाबतही माढा न्यायालयात खटला सुरु आहे. संबंधित तक्रारींचे निराकरण केल्याशिवाय गावची सरपंच निवड करु नये, असे तक्रारीत म्हटले आहे.