सांगलीत सहा वर्षांत डझनभर गुंडांची ‘गेम’

By Admin | Updated: November 24, 2014 23:08 IST2014-11-24T22:32:58+5:302014-11-24T23:08:06+5:30

‘खून का बदला खून’ : पन्नास नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर; फाळकूट दादांचे पेव फुटले

In Sangli, six dozen goons 'games' | सांगलीत सहा वर्षांत डझनभर गुंडांची ‘गेम’

सांगलीत सहा वर्षांत डझनभर गुंडांची ‘गेम’

सचिन लाड - सांगली -गुन्हेगारांच्या ‘खून का बदला खून’ अशा सूडबुद्धीमुळे सांगलीत गुन्ह्यांचा आलेख कधीच कोरा राहिलेला नाही. गुन्हेगारीत घट झाली असल्याचा दावा पोलीस करीत असले तरी, दोन दिवसांपूर्वी खून झालेल्या गुंड इम्रान मुल्लासारख्या अनेक फाळकूट दादांच्या गुन्हेगारी कारवाया सुरूच असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या सात वर्षात तब्बल डझनभर गुंडांची ‘गेम’ करण्यात आली आहे. यातून ५० नवीन गुन्हेगार पोलिसांच्या रेकॉर्डवर आले आहेत.
सांगलीचा गुन्हेगारी प्रवास थक्क करणारा आहे. गुंड राजू पुजारी, दाद्या सावंत या टोळ्यांनी काही वर्षांपूर्वी पोलिसांना हैराण करून सोडले होते. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर टोळीच्या गुन्हेगारीला पूर्णविराम मिळाला. काही वर्षांपूर्वी राजू पुजारी सांगलीतच पोलिसांच्या चकमकीत मारला गेला. त्यानंतर तब्बल वर्षभर शहराच्या गुन्हेगारीत सन्नाटा पसरला होता. वय वाढत गेल्यानंतर अनेक गुन्हेगारांना चांगले वागण्याचे शहाणपण सुचले आणि त्यांनी गुन्हेगारी वाटेवरील प्रवास थांबवला. जुन्या टोळ्या नामशेष होऊ लागल्यानंतर नवीन गुन्हेगारही निर्माण होऊ लागले आहेत.
गेल्या सात ते आठ वर्षांत गुंडाचा खून झाल्याच्या घटना वाढत आहेत. एकमेकांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी एकप्रकारे सूडनाट्याची मालिकाच सुरू आहे. विरोधातील टोळीला संपविण्याचा विडाच या गुन्हेगारांनी उचलला आहे. अर्धा डझनहून अधिक गुन्हे दाखल असूनही या गुंडांना एकाही गुन्ह्यात शिक्षा झालेली नाही.
दहशतीच्या जोरावर साक्षीदारांना ते दमदाटी करतात. यामुळे त्यांच्याविरुद्ध साक्ष देण्याचे कोणीच धाडस करीत नाही. परिणामी त्यांची दहशत वाढत जाते. परंतु त्याचा शेवटही अत्यंत वाईटपणे होत असल्याचे दिसून येते. दाद्या सावंत याचा खून होऊन तीन वर्षे होत आली तरी, अद्याप खटला सुरू नाही. त्याचे मारेकरी जामिनावर बाहेर असून, खुलेआम फिरतात. यातूनच बदला घेण्याची चक्रे डोक्यात फिरू लागतात.
पंचमुखी रस्त्यावर झालेला दुहेरी खून, टिंबर एरियातील खून या दोन्ही प्रकरणात संशयितांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. शिक्षा भोगत असताना कारागृहातून रजेवर बाहेर आलेल्या मुख्य संशयितांची विरोधी टोळीने ‘गेम’ केली आहे. यामुळे न्यायालयाने शिक्षा करूनही बदला घेण्याचा राग शांत झालेला दिसत नाही. गुंडाचा खून झाल्यानंतर रेकॉर्डवरचे एक नाव कमी होत असले तरी, या खुनातून नव्याने चार गुन्हेगार रेकॉर्डवर येत आहेत.

कोणा-कोणाची झाली गेम..?
गुंड इम्रान मुल्ला, दीपक पाटील, विजय पवार, अकबर अत्तार, विजय माने, अशोक माने, रफिक शेख, विठ्ठल शिंदे, संजय कोले, संजय पोतदार, सोमनाथ संकपाळ, विश्वनाथ ऊर्फ दादासाहेब सावंत, रोहित झेंडे, मिर्झा यांची आतापर्यंत ‘गेम’ झाली आहे. यातील संजय पोतदार, सोमनाथ संकपाळ या दुहेरी खुनातील आठजणांना जन्मठेप झाली आहे, तर काही खुनातील संशयित सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटले आहेत.

Web Title: In Sangli, six dozen goons 'games'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.