घरपट्टीपोटी दंड रद्द करण्याला मंजुरी
By Admin | Updated: June 21, 2014 01:02 IST2014-06-21T01:02:21+5:302014-06-21T01:02:21+5:30
महानगरपालिका : सर्वसाधारण सभेतील निर्णय

घरपट्टीपोटी दंड रद्द करण्याला मंजुरी
सोलापूर : शहर व हद्दवाढ भागातील घरमालकांना दरवर्षी भराव्या लागणाऱ्या टॅक्सपोटी महिन्याकाठी लावण्यात येणाऱ्या २ टक्क्यांप्रमाणे १२ महिन्यांचे २४ टक्के व नोटीस शुल्क, वॉरंट शुल्कात १0 टक्के अशाप्रकारे एकूण ३४ टक्के दंड रद्द करण्याच्या विषयाला एकमताने मंजुरी देण्यात आली.
शुक्रवारी बोलावण्यात आलेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा निर्णय झाला. महापौर अलका राठोड यांच्या उपस्थितीत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.
शहर व हद्दवाढ भागात अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे. असे असतानाही ९२ टक्के कराची वसुली होत असते. मात्र वर्षाकाठी देण्यात येणारा टॅक्स १५ दिवसांत न भरल्यास त्यावर महापालिकेकडून प्रतिमहा २ टक्क्यांप्रमाणे १२ महिन्यांचे २४ टक्के आणि नोटीस शुल्क, वॉरंट शुल्कात १0 टक्के अशाप्रकारे एकूण ३४ टक्के दंडाची आकारणी केली जात होती. मूलभूत सोयीसुविधा नसताना लावण्यात येणारा कर हा अन्यायकारक आहे तो रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत दाखल करण्यात आला होता.
यावर बोलताना नगरसेवक जगदीश पाटील म्हणाले की, सर्वसाधारण सभेची परवानगी न घेता प्रशासनाला दंड आकारण्याचा अधिकार आहे का? असा सवाल केला. तेव्हा सहायक आयुक्त पंकज जावळे यांनी तसा अधिकार असल्याचे सांगितले.
यावर बराच वेळ चर्चा झाल्यानंतर आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी जगदीश पाटील यांच्या बोलण्यात तथ्य असल्याचे सांगत आम्ही योग्य निर्णय घेऊ असे सांगितले. त्यानंतर दंड रद्द करण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर सर्वचनगरसेवकांनी आनंद व्यक्त केला.
----------------------------
हॉस्पिटलच्या सेवा काय आहेत...?
डॉक्टरांच्या मानधनाबाबत बोलताना अॅड. यू.एन.बेरिया म्हणाले की, आपण त्यांना इतके मानधन देतो पण हॉस्पिटलची पाहणी केली आहे का? सोयीसुविधा मिळतात का? डॉक्टर व्यवस्थित काम करतात का? अधिकारी याकडे दुर्लक्ष का करतात? असा सवाल सभेत केला.
डॉक्टरांचा अहवाल मागवा...हलगर्जीपणा करणाऱ्या डॉक्टरांना गेल्या तीन वर्षांत किती पगार देण्यात आला. तारखेनिहाय अहवाल तयार करून सादर करण्यात यावा, अशी मागणी यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे नामकरणाला मंजुरी...हैदराबाद-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील जुना पुना नाका लगत असलेल्या उड्डाण पुलास स्व. मा़ बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल असे नाव देऊन नामफलक लावण्याच्या प्रस्तावाला सभागृहात एकमताने मंजुरी देण्यात आली.
अण्णा तुमचे अभिनंदन... स्व. मा़बाळासाहेब ठाकरे उड्डाण पूल नामकरणाबद्दल विषय सुरू असताना, अण्णा आता कुठे आपल्यात मिळते-जुळते होत आहे. उड्डाण पुलाच्या नामकरणाचा विषय घेतल्याबद्दल तुमचे अभिनंदन अशा शब्दात नगरसेवक जगदीश पाटील यांनी सर्वसाधारण सभेत महेश कोठे यांना शुभेच्छा दिल्या. त्यावर सभागृहात हशा पिकला.