ऑनलाइन लोकमतसोलापूर, दि. 8 - सोलापुरातील माहिती अधिकार कायद्याचे (आटीआय) लढवय्ये आणि धाडसी कार्यकर्ते विद्याधर दोशी यांचे बुधवारी पहाटे एक वाजता सरस्वती चौकातील सेवासदन प्रशालेसमोरील राहत्या घरी ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते़ त्यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथील निगडी भागात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली, पत्नी, नातू असा परिवार आहे.
बुधवारी पहाटे एक वाजता त्यांना झटका आल्यानंतर आल्यानंतर तातडीने आश्विनी रुग्णालयात हलविण्यात आले होते मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले. त्यांचा पार्थिक अंत्यदर्शनसाठी सरस्वती चौकातील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला होता. मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील माहिती अधिकार मंचचे उपाध्यक्ष चंदूभाई देढीया, मसापचे जे़जे़ कुलकर्णी, भारतीय जैन संघटनेचे केतन शहा, आदीनाथ दिगंबर ट्रस्टचे सुनील गांधी, जैनस्कोचे अरुणकुमार धुमाळ, लोकहित मंचचे रामचंद्र रिसबुड, प्राणीमित्र विलास श्हा, रुद्रप्पा बिराजदार आदींनी अंत्यदर्शन घेतलेी़ त्यानंतर त्यांचा पार्थिक अंत्यसंस्कारासाठी पिंपरी-चिंचवड प्राधीकरणातील निगडी येथे नेण्यात आला.
माहिती अधिकार मंचचे ते संस्थापक अध्यक्ष होते. सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी धाडसी भूमिका बजाविली़ आम आदमी पार्टीचे संस्थापक सदस्य होते़ पुणे महापालिका कॉर्पोरेशन प्रेसमध्ये मॅनेजर म्हणून त्यांनी सेवा केली़ अनाधिकृत हौर्डिंग्ज लावणे, फडकुले सभागृहाचे जागा हस्तांतरण, सिध्देश्वर मंदिर परिसरातील घाणीचे साम्राज्य याबाबत त्यांनी वारंवार कोणाचीही भिडभाड न राखता सडेतोड आवाज उठविला़ शुक्रवारी १० मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता त्यांच्या निवासस्थानी शोकसभा होणार असल्याचे चंदुभाई देढीया यांनी सांगितले.