दूध भेसळीला लगाम

By Admin | Updated: July 29, 2014 01:13 IST2014-07-29T01:13:51+5:302014-07-29T01:13:51+5:30

‘महानंद’चा आदेश : वाहनांना अन्न व भेसळ परवाना बंधनकारक

Restrained milk disguise | दूध भेसळीला लगाम

दूध भेसळीला लगाम

 सोलापूर: सहकाराच्या स्पर्धेत खासगी संघ काढण्याची व ते टिकविण्यासाठी वाट्टेल ते करण्याची स्पर्धा लागल्याने भेसळयुक्त दुधाच्या पुरवठ्याच्या प्रकरणातही वाढ झाली आहे. भेसळयुक्त दुधाच्या तक्रारीला लगाम लावण्यासाठी महानंदने राज्यातील दूध संकलन व वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी अन्न व भेसळ प्रतिबंधक परवाना बंधनकारक केला आहे. येत्या ५ आॅगस्टपासून याची कडक अंमलबजावणी करण्याचा आदेशही काढला आहे.
राज्यात अलीकडे खासगीकरणाचे वारे जोरात वाहत आहेत. सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी अन् खासगी व सहकारी कारखान्याचे मल्टिेस्टेटमध्ये रुपांतर करण्याची स्पर्धा लागली आहे. जसे साखर कारखान्याचे तसे दूध संकलन करणाऱ्या संघाचे झाले आहे. अलीकडे राज्यात खासगी दूध संकलन करणारे संघ वरचेवर वाढत आहेत. या संख्येत मागील पाच वर्षांत झपाट्याने भर पडत आहे. सहकारी संघाच्या दूध संकलनावर परिणाम झाला असला तरी भेसळयुक्त दुधाच्या तक्रारीतही वाढ होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न केला जात असला तरीही स्वच्छ व निर्भेळ दूध मिळणे कठीण झाले आहे. यावर उपाययोजना म्हणून गावपातळीवर दूध संकलन करणाऱ्या संस्था, टेंपो व दूध वाहतूक करणाऱ्या टँकरला अन्न व औषध प्रशासन खात्याचा परवाना घेणे बंधनकारक केले आहे.
-------------------------
आरोग्याची काळजीही वाढली
गाईच्या दुधाला ३.५ टक्के फॅट व ८.५ एस.एन.एफ. (इतर घनघटक, नॉन सॉलिड फॅट) गुण प्रत असणे बंधनकारक
प्रत्येक दूध संघासाठी हे बंधनकारक असून अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तपासणी करुन कारवाई करणार
कायद्याचे पालन न करणाऱ्या संस्था व वाहनांवर कडक कारवाई करणार
महानंदने राज्यातील दूध संघांना कडक निर्देश देताना दूध संकलन करणाऱ्या संस्था व वाहनाकडे परवाना बंधनकारक असल्याचे म्हटले आहे
२७ जानेवारी २०१४ रोजी अन्न व औषध आयुक्तांनी यासंबंधी घेतलेल्या बैठकीत झाला निर्णय
या निर्णयाच्या कडक अंमलबजावणीचे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद)चे वरिष्ठ व्यवस्थापक (गुणनियंत्रण) यांचे निर्देश
--------------------------------
मिळालेल्या आदेशानुसार खासगी व सहकारी दूध संघाचे दूध संकलन करणाऱ्या संस्था व वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी परवाना घेण्यासाठी प्रबोधन केले जात आहे. परवाना घेण्यासाठी संस्था व दूध वाहतूक करणारे वाहन चालकही परवाने घेऊ लागले आहेत. ५ आॅगस्टनंतर आदेशाप्रमाणे कारवाई करु.
-प्रकाश यादव
अन्न सुरक्षा अधिकारी, सोलापूर

Web Title: Restrained milk disguise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.