रेखा, पिंकी, स्विटीला स्वत:ची ओळख; सोलापुरातील तृतीयपंथीयांना मिळालं मतदान ओळखपत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2022 04:31 PM2022-01-27T16:31:56+5:302022-01-27T16:32:04+5:30

राष्ट्रीय मतदार दिन : सन्मान मिळाल्याच्या भावना केल्या व्यक्त

Rekha, Pinky, Sweetie's own identity; Third parties in Solapur got voting cards | रेखा, पिंकी, स्विटीला स्वत:ची ओळख; सोलापुरातील तृतीयपंथीयांना मिळालं मतदान ओळखपत्रं

रेखा, पिंकी, स्विटीला स्वत:ची ओळख; सोलापुरातील तृतीयपंथीयांना मिळालं मतदान ओळखपत्रं

Next

सोलापूर : तृतीयपंथीयांना समाजात चांगली वागणूक आणि सन्मान मिळत नाही. त्यामुळे ते समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होत नाहीत. त्यांची ही ओळख पुसून टाकण्याचे काम उपजिल्हा निवडणूक कार्यालयाने केले आहे. चालू वर्षात तब्बल १२८ तृतीयपंथीयांना मतदार यादीत समाविष्ट करून घेतले असून मंगळवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रातिनिधिक स्वरूपात काही तृतीयपंथीयांना सन्मानाने ओळखपत्र वाटप केले. त्यानंतर त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू प्रकटले. आनंदी चेहऱ्याने ओळखपत्र दाखवत मतदान हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे, तो आम्ही मिळवलाच, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूरच विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्याहस्ते रोहित वाघमारे, विनायक पाटील, रेखा मोरे, सिद्धी जगताप आणि शंकर सलगर यांना मतदान कार्डाचे वाटप केले. राष्ट्रीय मतदार दिनाचे औचित्य साधून मंगळवारी, उपजिल्हा निवडणूक कार्यालय तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाकडून नवीन मतदारांना ओळखपत्राचे वाटप करण्यात आले. उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांच्या पुढाकारातून कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, दिवाणी न्यायाधीश तथा जिल्हा विधी प्राधिकरणचे सचिव शशिकांत मोकाशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे, गिर्यारोहक आनंद बनसोडे, प्रभारी कुलसचिव डॉ. सुरेश पवार उपस्थित होते.

ऑनलाईन घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेतील विजेत्यांचा यावेळी मान्यवरांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. नवमतदारांना मतदान कार्डाचे वाटप करण्यात आले. यामध्ये अमित बनसोडे, ओंकार पाटील, अक्षय खाडे, प्रतीक्षा डोंगरे, सुनील माळगे या नवमतदारांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्ड वाटप करण्यात आली.

उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे यांचे कौतुक

१ जानेवारीपर्यंत मतदार यादीमधील त्रुटी, नवमतदार नोंदणी, मतदार पुनरीक्षण आणि इतर कामे पूर्ण केली असल्याने सोलापूर जिल्ह्याचा राज्यात प्रथम क्रमांक आला आहे. निरामय संस्था आणि क्रांती महिला संघटनांच्या मदतीने वंचित घटक, तृतीयपंथीय नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना प्रथमच मतदानाचा अधिकार प्राप्त करून दिला आहे. जिल्ह्यात १२८ तृतीयपंथीयांची नोंदणी केली आहे. सोलापूर जिल्ह्यात उत्कृष्ट काम झाल्याने निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांचे काैतुक केले.

........................

Web Title: Rekha, Pinky, Sweetie's own identity; Third parties in Solapur got voting cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.