जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सरासरी ओलांडली
By Admin | Updated: September 3, 2014 00:48 IST2014-09-03T00:48:06+5:302014-09-03T00:48:06+5:30
मागील वर्षीपेक्षा अधिक पाऊस : काही तलावही भरले

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने सरासरी ओलांडली
सोलापूर : यंदा उच्चांकी ऊस गाळपासाठी साखर कारखाने सज्ज झालेले असतानाच उजनी धरणाची वाटचाल १०० टक्के भरण्याकडे सुरू आहे. अशातच पावसाने सरासरी ओलांडली असल्याने पाण्याची चिंता कमी झाली आहे.
यंदा आजपर्यंतचे उच्चांक मोडेल इतके ऊस गाळप होईल सोलापूर जिल्ह्यात असा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाचा आहे. एक कोटी ७० लाख इतके गाळप होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच साखर कारखाने सुरू झाले असले तरीही ऊस शिल्लक राहील असे चित्र आहे. असे असले तरी पाऊस लांबल्याने शेतकरी धास्तावला होता. यंदा पाऊस कमी असल्याचा सर्वांचा अंदाज असताना मघा नक्षत्राने सोलापूर जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. मागील आठवडा शेतकऱ्यांसाठी चांगला ठरला असून या आठवड्यात जिल्हाभरात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडला आहे. मागील वर्षीपेक्षा यावर्षी जिल्ह्यातील काही लघू व मध्यम प्रकल्पाला पाणी आले आहे. काही तलाव १०० टक्के भरले असून काही तलावात अंशत: पाणी आले आहे. काही तलाव अद्याप तळपातळीला आहेत. परंतु उशिराने उजनी धरण भरण्याकडे वाटचाल सुरू आहे. पुणे जिल्ह्यातून अशाच पद्धतीने पाणी येत राहिले तर आठवडाभरात उजनी धरण १०० टक्के भरण्याचा अंदाज आहे.
---------------------------
सर्वच तालुक्यात सरासरी ओलांडली
मागील आठवड्यापर्यंत पावसाची आशेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना पाऊस चांगला झाल्याने आनंद झाला आहे. सर्वच्या सर्व ११ तालुक्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे. जून, जुलै व आॅगस्ट महिन्यात एकूण ३५०६ मि.मी. पाऊस पडणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात ३५५५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी आॅगस्टअखेरपर्यंत ३ हजार ४७ मि.मी. पाऊस पडला होता.
---------------------------------
तालुकानिहाय पाऊस
प्रत्येक तालुक्यात एक ते १० मि.मी. दरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. उत्तर सोलापूर- ३३९ मि.मी., दक्षिण सोलापूर- ३०९ मि.मी., बार्शी- ३१० मि.मी., अक्कलकोट- ३५१ मि.मी., पंढरपूर-३०७ मि.मी., मंगळवेढा-३२३ मि.मी., सांगोला- ४२७ मि. मी., माढा-२८४ मि.मी., मोहोळ-२९० मि.मी., करमाळा- ३३३ मि.मी., माळशिरस- २८० मि.मी. एकूण-३५५५ सरासरी- ३२३ मि.मी.