सांगलीत खेळाडूंना गुणवत्ता प्रशिक्षण
By Admin | Updated: April 27, 2015 00:17 IST2015-04-26T23:30:10+5:302015-04-27T00:17:01+5:30
क्रीडा संघटना सरसावल्या: जिल्ह्यातील पहिलाच प्रयोग

सांगलीत खेळाडूंना गुणवत्ता प्रशिक्षण
सांगली : महाराष्ट्राला मातब्बर खेळाडू देणारी क्रीडापंढरी सांगली आता क्रीडा मानसशास्त्र व तंत्रशुध्द प्रशिक्षणाकडे वळत आहे. संथ वाहणाऱ्या कृष्णाकाठच्या ‘स्पोर्टस् टॅलेन्ट’ला लाल मातीतील गुणवत्तेचे धडे देण्यासाठी आता जिल्ह्यातील एकविध क्रीडा संघटनाच सरसावल्या आहेत. या विविध खेळांच्या संघटनांनी एकत्र येऊन क्रीडा गुणवत्ता प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग आहे. जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ३ ते १५ मेदरम्यान हे प्रशिक्षण पार पडणार आहे.
खेळाडू घडण्यासाठी केवळ धष्टपुष्ट शरीर असून चालत नाही. त्या शरीरात तितक्याच ताकदीचे सशक्त मन असावे लागते. आपले खेळाडू नेमके कुठे मागे पडतात?, स्पर्धेतील पराभवाची कारणे काय?, शारीरिक क्षमतेचा खेळाशी काय संबंध?, स्पर्धेपूर्वी खेळाडूची तयारी कशी असावी?, योग्य आहार व व्यायाम, क्रीडा मानसशास्त्र आणि तंत्रशुध्द प्रशिक्षण आदी विषयांवर जिल्'ातील विविध खेळांच्या संघटनांची बैठक पार पडली. या बैठकीतून एका नवीन संकल्पनेचा उदय झाला. ही संकल्पना म्हणजे ‘क्रीडा गुणवत्ता प्रशिक्षण’.
समाजातील सर्व स्तरातील खेळाडूंना त्यांना आवडेल त्या खेळांचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विविध खेळांच्या क्रीडा संघटना धाडसाने पुढे आल्या आहेत. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयानेही हे प्रशिक्षण यशस्वी करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले आहे. पहिल्या टप्प्यात जिम्नॅस्टिक, अॅक्रोबॅटिक्स, मल्लखांब, थांगता, तायक्वांदो, चॉकबॉल, जलतरण, योगासन, स्पोर्टस् डान्स आदी खेळांचे धडे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. यामध्ये दीपक सावंत, उमेश बडवे, प्रताप पाटील, सुरेश चौधरी, डॉ. सुहास व्हटकर, उदयकुमार पाटील, शंकर भास्करे, सुनील कोळी, सुधाकर जमादार, संजय जाधव, काजल काळे, हेमंत सावंत हे राष्ट्रीय प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. प्रशिक्षण प्रमुख म्हणून जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक यांची निवड झाली आहे.
गुणवत्ता, क्रीडा मानसशास्त्र, संशोधन व प्रथमोपचार या चार गोष्टींवर या प्रशिक्षणात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, टी-शर्ट व शॉर्ट देण्यात येणार आहे. नवोदित विद्यार्थ्यांसाठी हे प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असा विश्वास क्रीडाधिकारी नाईक यांनी व्यक्त केला. (क्रीडा प्रतिनिधी)